नाशिक Lok Sabha Election 2024: नाशिक लोकसभा मतदारसंघात 20 मे रोजी मतदान होणार आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या निदर्शनानुसार मतदारसंघात 75 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान व्हावं यासाठी जिल्हा निवडणूक विभागाकडून मतदार जनजागृतीवर विशेष भर दिला जात आहे. अशात दुसरीकडं मतदानाच्या टक्का वाढावा यासाठी मुस्लिम धर्मगुरू शहर ए- काझी यांनी 20 मे रोजी कोणाचाही निकाह (लग्न) लावणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं या दिवशी शहरातील विविध भागात ठरलेले निकाह पुढे ढकलून ते मंगळवारी करण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे.
धर्मगुरूंकडून मतदानाबाबत जनजागृती : नाशिक मधील मुस्लिम धर्मगुरू शहर-ए-खतीब हाजीफ हिजामोद्दीन खतीब आणि शहर-ए-काझी यांनी मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी मुस्लिम समाजात मोठ्या प्रमाणात जनजागृती केली आहे. सर्वांना मतदान करता यावं यासाठी निकाह सह इतर सार्वजनिक कार्यक्रमही या दिवशी रद्द करण्यात आले आहेत. नाशिकमध्ये प्रथमच प्रमुख मुस्लिम धर्मगुरूंकडून मतदानाबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली जात आहे. मतदान प्रक्रियेत अधिकाधिक मतदारांनी सहभागी व्हावं, प्रत्येकाला आपल्या एका मताचं महत्त्व कळावं, कोणीही कुठल्याही आमिषाला बळू पडू नये, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तसेच मताच महत्त्व लोकांना समजून सांगण्याचा प्रयत्न या अभियानाच्या माध्यमातून मुस्लिम धर्मगुरूंकडून करण्यात येत आहे. प्रत्येक मतदाराने मतदानाचा हक्क बजाववा असंही आवाहन यावेळी करण्यात आलं.