शिर्डी (अहिल्यानगर) - साईबाबांचे बोलवण आल्यावरच आपण शिर्डीला येवू शकतो. आज साईबाबांचं बोलवण आल्यानं सहपरिवार शिर्डीला आलो आहे. साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतलं आहे. नवीन वर्ष सुरू झाले आहे. साईबाबांचा आशीर्वाद घेवून नवीन वर्षाची सुरवात केली असल्याचं माजी क्रिकेटपटू व्यंकटेश प्रसाद यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
माजी क्रिकेटपटू व्यंकटेश प्रसाद यांनी पत्नी जयंती आणि मुलगा पृथ्वी यांच्यासह शिर्डीला येवून साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले आहे. साई दर्शनानंतर माध्यमांशी बोलतांना प्रसाद म्हणाले," ग्रामीण भागातील मुलांमध्ये टॅलेंट लपलेले आहे. त्यामुळे अजून क्रिकेट बोर्डाला फार काम काम करायचं आहे. फक्त शहरी भागात सोयी सुविधा उपलब्ध करवून दिल्या पाहिजे, हा सगळ्या क्रिकेट असोसिएशनचा अजेंडा आहे. जिल्हास्तरावर सोयी सुविधा उभ्या करणे, तसेच त्या भागात असलेल्या टॅलेंट असणाऱ्यांना कोचिंग देणे हा उद्देश असला पाहिजे," असे माजी क्रिकेटपटू व्यंकटेश प्रसाद यांनी सांगितलं आहे.
व्यंकटेश प्रसाद यांनी काय दिला सल्ला- साई संस्थाननं प्रसादालयातील मोफत जेवण बंद करावे असे वादग्रस्त वक्तव्य माजी खासदार सुजय विखे यांनी दोन दिवसांपूर्वी केले होते. शासनाने संस्थानला दिलेल्या जागेवर आयपीएलचे सामने होतील असे स्टेडीयम उभारावे, अशी त्यांनी मागणी केली होती. या प्रश्नावर बोलताना प्रसाद म्हणाले, " स्टेडीयम तर फार आहेत. स्टेडीयम बनवण्यासाठी पाचशे-सातशे कोटी खर्च करू नये. ग्रामीण भागात चांगले मैदान बनवून खेळाडुंना सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. स्टेडीयमसाठी मोठा खर्च करुन फार फायदा होणार नाही. एक मॅचसाठी इतका पैसा का खर्च करावा? तो पैसा खेळाडुंच्या कोचिंग आणि सुविधेसाठी करावा," असं स्पष्ट मत व्यंकटेश प्रसाद यांनी व्यक्त केलं
साईसंस्थानकडून व्यंकटेश प्रसाद यांच्या कुटुंबीयांचा सत्कार-भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू व्यंकटेश प्रसाद यानं सहकुटुंब शिर्डीत येत साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतले आहे. यावेळी साईबाबांच्या शेजाआरती आणि काकड आरतीला सहपरिवार हजेरी लावलीय. साईबाबांच्या दर्शनानंतर संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी संदीपकुमार भोसले यांनी शाल आणि साईमूर्ती देवून प्रसाद कुटुंबीयांचा सत्कार केला. यावेळी संस्थान जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके , सुरक्षा अधिकारी रोहिदास माळी, शिर्डीतील संग्राम कोते आणि दीपक गोंदकर उपस्थित होते.
हेही वाचा-