नागपूर- भरधाव कार अचानक विहिरीत कोसळल्यामुळे तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागपूरच्या बुटीबोरी येथे घडलीय. मृत तीन तरुणांपैकी एक तरुण हा कार चालवणे शिकत होता आणि त्यादरम्यान ही घटना घडली असल्याची माहिती समोर आलीय. बुटीबोरी पोलिसांनी तिन्ही तरुणांचे मृतदेह हे विहिरीबाहेर काढले असून, उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आलेत. मृतकांची नावेदेखील आता समोर आली असून, त्यात सूरज सिद्धार्थ चव्हाण, साजन सिद्धार्थ चव्हाण आणि संदीप चव्हाण यांचा समावेश आहे. तसेच मृतकांपैकी दोघे सख्खे भाऊ आहेत. खरं तर ही घटना काल रात्री 11 ते 11:30 दरम्यान बुटीबोरीमधील एमआयडीसी परिसरात घडलीय. तीन तरुण कारने जात असताना त्यांची कार ही थेट रस्त्यालगत असलेल्या कठडा नसलेल्या विहिरीत कोसळली आणि या घटनेत तिघांचा कारमध्ये अडकून बाहेर पडता न आल्यानं बुडून मृत्यू झालाय.
नागरिकांच्या मदतीने कार बाहेर काढली, पण... : घटनेची माहिती मिळताच रात्री उशिरा बुटीबोरी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्याने नागरिकांच्या मदतीने अपघातग्रस्त कार विहिरीतून ओढून बाहेर काढली. मात्र, तोपर्यंत तिन्ही तरुणांचा मृत्यू झालाय, पुढील तपास बुटीबोरी पोलिसांनी सुरू केलाय.
असा आहे घटनाक्रम : सूरज सिद्धार्थ चव्हाण, साजन सिद्धार्थ चव्हाण आणि संदीप चव्हाण हे तिघे रात्री 11 वाजता कारने घराबाहेर पडले होते. तिघांपैकी एक जण कार शिकत होता. बालभारती मैदानाजवळ रात्रीच्या अंधारात त्यांना कठडा नसलेली विहीर दिसली नाही, त्यामुळे कार थेट विहिरीत जाऊन पडली. रात्री सुमारे साडे अकराच्या सुमारास बुट्टीबोरी पोलीस ठाण्याला माहिती समजली, बालभारती मैदानाजवळ असलेल्या विहिरीमध्ये एक कार पडलेली आहे. माहिती मिळाल्यानंतर लगेचचं पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असता एक कार पाणी भरलेल्या स्थितीत विहिरीत पडलेली सापडली, त्यानंतर अग्निशामक दलाला घटनास्थळी पाचारण करण्यात आलंय. परंतु विहिरीमध्ये अधिक पाणी असल्यामुळे कार बाहेर काढण्यास अडथळा येत होता. त्यामुळे पंपाच्या साहाय्यानं विहिरीतील पाणी रिकामे केल्यानंतर कार बाहेर काढण्यात आली असता त्यामध्ये सूरज आणि साजन हे दोघे सख्खे भाऊ आणि त्यांचा मित्र संदीप चव्हाण यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आलेत.
हेही वाचा -