बीड : सुदर्शन घुलेला आवादा कंपनीला खंडणी मागितल्याप्रकरणी 12 फेब्रुवारी रोजी केज न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यानंतर त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली. आज 14 फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा केज न्यायालयात त्याला हजर केलं असता केज न्यायालयानं खंडणी प्रकरणात सुदर्शन घुलेला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सुदर्शन घुलेला न्यायालयीन कोठडी ठोठावल्यानंतर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी गंभीर आरोप केले आहेत. संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणातील बी टीमवर कधी कारवाई करणार असा सवाल धनंजय देशमुख यांनी केला.
सुदर्शन घुलेचं घेतलं व्हाईस सॅम्पल : सुदर्शन घुले याला न्यायालयीन कोठडीत असताना दोन वेळा पोलीस कोठडी देण्यात आली. त्यामध्ये सुदर्शन घुलेचे व्हाईस सॅम्पल देखील घेण्यात आले. याचं कारणही तसेच आहे. 29 नोव्हेंबर 2024 रोजी अवादा कंपनीला खंडणी मागितल्या प्रकरणी ज्या फोनवरून कॉल केले, त्यामध्ये सुदर्शन घुले हा प्रमुख आहे. त्यामुळे त्याला न्यायालयीन कोठडीतून दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. या दरम्यान पोलिसांनी सुदर्शन घुलेचं व्हाईस सॅम्पल घेतलं. ते न्यायालयात देखील हजर करण्यात आलं आहे. पुन्हा एकदा सुदर्शन घुलेला कारागृहात पाठवण्यात आलं आहे.
बी टीमवर कारवाई कधी करणार ? : एकीकडं सुदर्शन घुलेसह इतर आरोपी अटक आहेत. मात्र कृष्णा आंधळे हा आरोपी अद्यापही फरारच आहे. त्याला अटक करावी, अशी मागणी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे वारंवार करत आहेत. मात्र कृष्णा आंधळे हा स्थानिक गुन्हे शाखेसह एसटी आणि सीआयडीला गुंगारा देत तो सापडत नसल्यानं प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यामध्ये दुसरी एक बी टीम यासंदर्भात काम करत असल्याचा आरोप धनंजय देशमुख यांनी व्यक्त केला आहे. यामध्ये डॉ सुभाष वायबसे, बालाजी तांदळे, संजय केदार, मोराळे या व्यक्तींना सहआरोपी करावं, अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे. मात्र ज्यावेळेस पोलीस प्रशासनाला विचारणा केली, त्यावेळी त्यांनी सांगितलं की त्यांनी या आरोपींना कुठल्याही प्रकारचं सहकार्य केलेलं नाही. त्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, असं सांगण्यात येत आहे. त्यामुळे धनंजय देशमुख जे आरोप करत आहेत, त्यावर आता एसआयटी, सीआयडी आणि स्थानिक गुन्हे शाखा नेमका काय निर्णय घेते, हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा :