मुंबई - मराठी चित्रपट आशयघनतेसाठी ओळखला जातो. मराठी चित्रपटसृष्टीत दमदार कथानकाबरोबर रोमँटिक, कौटुंबिक आणि सामाजिक चित्रपटांची रेलचेल असली तरी अॅक्शनपट तुलनेने कमी पाहायला मिळतात. परंतु आता ती कमतरता भरून काढण्यासाठी दमदार अॅक्शन असलेला 'गौरीशंकर' नावाचा चित्रपट येऊ घातलाय. चित्रपटाचं नाव जरी धार्मिक वाटत असले तरी यात भरपूर अॅक्शन असेल आणि एका वेगळ्या धर्तीची प्रेमकथा बघायला मिळेल. नुकताच याचा टिझर प्रदर्शित करण्यात आला.
या चित्रपटाची टॅगलाइन, "प्रेमात हरला नाही, प्रतिशोधाने थांबला नाही - तोच ‘गौरीशंकर’!" अशी असून प्रेमाच्या रणांगणात न हारणारा आणि प्रतिशोधाच्या मार्गावर न थांबणारा ‘गौरीशंकर’ प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. टीझरमध्ये एक निडर आणि रांगडा तरुण जबरदस्त अॅक्शन करताना दिसतो. "टेन्शन लेने का नाही, देने का!" असे म्हणत तो आपल्या जीवनाची फिलॉसॉफी दर्शवितो. तसेच नायकाच्या धगधगत्या प्रवासाची झलक देतो.
दिग्दर्शक हरेकृष्ण गौडा यांनी या चित्रपटाची संकल्पना मांडली असून, त्यांनीच दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. विशाल प्रदीप संपत यांच्या मुव्हीरूट प्रॉडक्शन्सच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती झाली असून, ऑरेंज प्रॉडक्शन्स सहनिर्माते आहेत. या चित्रपटात हरेकृष्ण गौडा, कविता वसानी, दक्षिणा राठोड, राहुल जगताप, सुशील भोसले, संकेत कोळंबकर हे प्रमुख भूमिकांत झळकणार आहेत.
संगीत दिग्दर्शन प्रशांत आणि निशांत यांनी केले असून, रोशन खडगी यांनी छायांकन केले आहे. गीतलेखन संकेत कोळंबकर यांनी केले असून, अमित जावळकर यांनी संकलनाची जबाबदारी पार पाडली आहे. अॅक्शन राशिद मेहता यांनी कोरिओग्राफ केली असून कला दिग्दर्शन अमित चिंचघरकर यांचे आहे. नितिन दांडेकर आणि धनश्री साळेकर यांनी मेकअप व वेशभूषेची जबाबदारी सांभाळली आहे, तर कार्यकारी निर्माते म्हणून सिद्धेश आयरे कार्यरत आहेत.
‘गौरीशंकर’ हा दमदार, जबरदस्त अॅक्शनपट येत्या २८ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे