ठाणे : मिठाईत गुंगीचं औषध देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला उत्तर प्रदेश राज्यातील सिद्धार्थ नगर जिल्ह्यात पोलिसांनी बेड्या ठोकल्या. हा नराधम डोंबिवली पूर्वेतील मानपाडा पोलीस ठाण्याच्या परिसरात एका अल्पवयीन मुलीवर तिच्या घरात बलात्कार करून फरार झाला होता. बऱ्याच महिन्यांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता.
नराधम आणि पीडिता दोघंही उत्तर प्रदेशातील : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी आणि नराधम उत्तर प्रदेश राज्यातील रहिवासी असल्यानं दोघंही एकमेकांच्या ओळखीचे आहेत. विशेष म्हणजे पीडित मुलगी डोंबिवली पूर्वेतील एका वस्तीत कुटुंबासह राहून भंगार गोळा करण्याचं काम करत होती. तर नराधम हाही भंगार गोळा करण्याचा व्यवसाय करुन तो पीडित अल्पवयीन मुलीच्या घरीच राहात होता. त्यातच जानेवारी 2022 मध्ये नराधमाची वाईट नजर त्या पीडित मुलीवर पडली. तेव्हापासून तो तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र पीडित मुलगी त्याला विरोध करत होती. त्यानंतर मात्र ऑक्टोबर 2024 मध्ये नराधमानं पीडित मुलीला मिठाईमधून गुंगीचं औषध देऊन तिला बेशुद्ध केलं. त्यानंतर त्यानं तिच्यावर राहत्या घरातच बलात्कार केला.
पीडितेच्या भावाला ठार मारण्याची धमकी देत अत्याचार : बलात्काराच्या घटनेनंतर पीडित मुलगी भयभीत झाली. या घटनेचा फायदा घेऊन नराधमानं नोव्हेंबर 2024 रोजी पीडितेला आणि तिच्या भावाला ठार मारण्याची धमकी देऊन पीडित मुलीवर बलात्कार केला. त्याच्याकडून होणाऱ्या वारंवार बलात्कारांच्या घटनामुळं पीडित अल्पवीयन मुलीला त्रास असहाय्य झाला. अखेर तिनं 14 डिसेंबर रोजी मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन नराधमाविरोधात तक्रार दाखल केली. पीडितेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 64(1), 64(2)(आय ), 64 (2) (एम ), 123, 79, 351(2), सह पोक्सोचे कलम 4, 6, 8, 12 नुसार गुन्हा दाखल केला.
गुन्हा दाखल होताच नराधमानं ठोकली धूम : गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण नराधमाला लागताच तो मुळगाव असलेल्या उत्तरप्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यातील गावात पळून गेला. तेव्हापासून त्याचा शोध मानपाडा पोलीस घेत होते. यातच उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यातील कपिलवास्तु इथल्या एका गावात तो लपल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यानं दिली. त्यामुळे मानपाडा पोलिसांनी नराधमाच्या गुन्ह्याची माहिती युपीमधील गोरखपूर इथल्या एसटीएफ पथकाला दिली. एसटीएफ पथकानं 4 जानेवारी 2025 रोजी युपीमधील ग्राम मरवटीया कुर्मी गावाच्या हद्दीत सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं. त्यानंतर कपिलवास्तु पोलीस ठाण्यात त्याला ताब्यात घेतल्याची नोंद करुन 6 जानेवारीला उत्तर प्रदेश पोलिसांनी ताब्यात असलेल्या आरोपीला मानपाडा पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे. पुढील तपास मानपाडा पोलीस करत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबने यांनी दिली आहे.
हेही वाचा :