मुंबई - नवोदित अभिनेत्री सिमर भाटिया श्रीराम राघवन यांच्या 'इक्किस' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. नुकतंच अक्षय कुमारनं सोशल मीडियावर तिचं अभिनंदन केलं आहे. खरंतर, 2025 हे वर्ष स्टार किड्ससाठी खास ठरणार आहे. यंदा अनेक फ्रेश चेहरे बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज झाले आहेत. यामध्ये रवीना टंडनची मुलगी राशा थडानी, अजय देवगणचा पुतण्या आमन देवगन आणि सैफ अली खान-अमृता सिंग यांचा मुलगा इब्राहिम अली खान यांचा समावेश आहे. याशिवाय श्रीदेवीची मुलगी खुशी आणि आमिर खानचा मुलगा जुनैदचा चित्रपटही थिएटरमध्ये झळकणार आहे. या स्टार किड्सच्या यादीत सिमर भाटियाचा फोटो पाहून बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारनं लिहिलं की, "मला आठवतं की पहिल्यांदा मी माझा फोटो वर्तमानपत्राच्या मुखपृष्ठावर पाहिला होता. तेव्हा मला वाटलं होतं की हा सर्वात मोठा आनंद आहे. पण आज मला माहित आहे की आपल्या मुलांचा फोटो पाहण्याचा आनंद त्याहूनही मोठा आहे."
यावेळी अक्षयनं त्याची दिवंगत आई आणि सिमरची आजी अरुणा भाटिया यांचीही आठवण काढली. त्यानं लिहिलं, "जर माझी आई आता इथं असती तर ती म्हणाली असती, 'सिमर पुत्तर तू ता कमाल है. मेरे बच्चे, तुम्हें आशीर्वाद, ये आसमान तुम्हारा है'. नंतर सिमरनं तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर अक्षयची पोस्ट पुन्हा शेअर केली आणि लिहिलं, 'तुम्ही त्या 'आसमान'चं रक्षण करत आहात, स्कायफोर्स, लव्ह यू'.
कोण आहे सिमर भाटिया?
सिमर भाटिया ही अक्षय कुमारची बहीण अलका भाटियाची मुलगी आहे. अलका एक फिल्म मेकर आहे आणि तिनं 1997 मध्ये वैभव कपूरशी लग्न केलं होतं. त्यांना सिमर ही पहिली मुलगी आहे. परंतु, नंतर हे जोडपं वेगळं झालं आणि 2012 मध्ये अलकानं रिअल इस्टेट टायकून सुरेंद्र हिरानंदानीबरोबर लग्न केलं. सिमर सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि लोकांना ती आवडते. तिचे सोशल मीडियावर 12.7K पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.
सिमर भाटिया अगस्त्य नंदाबरोबर पदार्पण करणार
श्रीराम राघवन यांच्या 'इक्किस' चित्रपटातून सिमर भाटिया बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे, ज्यामध्ये ती अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेता धर्मेंद्र आणि जयदीप अहलावत यांच्याही भूमिका आहेत. 1971 च्या भारत-पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर बेतलेली ट्वेंटी वन ही सेकंड लेफ्टनंट अरुण खेतरपाल यांची कथा आहे. त्यांना त्यांच्या शौर्याबद्दल मरणोत्तर परमवीर चक्र प्रदान करण्यात आलं होतं. दिनेश विजन यांच्या मॅडॉक फिल्म्सच्या बॅनरखाली हा चित्रपट तयार होत असून या वर्षाच्या अखेरीस प्रदर्शित होणार आहे.