मुंबई- कुर्ला येथील मदर डेअरीची जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी उद्योगपती गौतम अदानी यांच्या समूहाला देण्याच्या सरकारच्या निर्णयाला स्थानिक नागरिकांनी मोठा विरोध दर्शवलाय. सरकारच्या या निर्णयाविरोधात स्थानिक नागरिकांनी आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार वर्षा गायकवाड यांनी गुरुवारी सकाळी आंदोलन सुरू केलंय. मात्र, मुंबई पोलिसांनी या आंदोलनात हस्तक्षेप केल्याने काही काळ परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. मदर डेअरीमध्ये बोटॅनिकल गार्डन व्हावे, अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे.
मदर डेअरीची जागा धारावी पुनर्विकासाला देण्यासाठी विरोध : परंतु स्थानिक नागरिकांच्या मागणीला दूर सारत सरकारने हा भूखंड अदानी समूहाला देण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे या निर्णयाविरोधात नागरिकांमध्ये मोठी नाराजी आहे. मुंबई काँग्रेसने सातत्याने या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. गुरुवारी सकाळी या ठिकाणी आंदोलन करण्यात आलंय. कुर्ला येथील मदर डेअरीची जागा धारावी पुनर्विकासाला देण्यासाठी विरोध होतोय. या जागेची मोजणी करण्यासाठी प्रक्रिया सुरू झालीय. त्यामुळे त्या विरोधात वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलंय. ही मोजणी प्रक्रिया रद्द करावी, अशी आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. मात्र आंदोलकांना पुढे जाण्यास पोलीस परवानगी देत नसल्याने आंदोलकांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू केलंय.
आंदोलकांना दडपण्याचा प्रयत्न : मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी पोलिसांच्या धक्काबुक्कीचा निषेध नोंदवलाय. सरकार पोलिसांच्या माध्यमातून सर्वसामान्य नेते आणि आंदोलकांना दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. आम्ही घर मागण्यासाठी किंवा इतर काही गोष्टींसाठी आलो नसून आम्ही आमचा हक्क मागण्यासाठी आलोय. त्यामुळे पोलिसांकडून झालेली धक्काबुक्की निषेधार्ह असल्याचं वर्षा गायकवाड म्हणाल्या. मुंबईतील पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या जागा अशा पद्धतीने उद्योगपतींच्या घशात घातल्या जात असतील, तर मुंबईकरांसाठी ते अत्यंत दुर्दैवी ठरेल, असे गायकवाड म्हणाल्यात. यावेळी महिला आंदोलकांनादेखील धक्काबुक्की झाल्याचा आरोप त्यांनी केलाय.
हेही वाचाः
अदानीला मुंबई आंदण देण्याची भाजपाची 'लाडका मित्र योजना' - खासदार गायकवाड - Land in Mumbai to Adani