ठाणे : लाच घेणं आणि लाच देणं हा गुन्हा असला तरी, अनेक शासकीय कार्यलयासह बहुतांश पोलीस ठाण्यात लाचखोरी सुरुच आहे. भिवंडी इथल्या कोनगाव पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक राजेश डोंगरे (३४) यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं सापळा रचून १० हजार रुपयांची लाच घेताना पकडलं. हत्येच्या प्रयत्नातील गुन्ह्यात संशयित आरोपीला अटक करू नये यासाठी त्यांनी तक्रारदाराकडून लाचेची मागणी केल्याचं स्पष्ट झालं. राजेश डोंगरे यांच्याविरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
आरोपीला शिक्षा होऊ नये म्हणून केली लाचेची मागणी : कोनगाव पोलीस ठाण्यात राजेश डोंगरे हे पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. कोनगाव पोलीस ठाण्यात हत्येच्या प्रयत्नाचा एक गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणातील एका संशयित आरोपीला शिक्षा होऊ नये यासाठी डोंगरे यांनी त्याच्याकडून ८० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तडजोडीअंती २५ हजार रुपये देण्याचं ठरलं होतं.
सापळा रचत केली कारवाई : अखेर त्यांनी याप्रकरणी तक्रार देण्यासाठी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. त्यांनी राजेश डोंगरे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. यानंतर तक्रारदारांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडं धाव घेत याबाबात तक्रार दिली. त्या तक्रारीत पोलीस उपनिरीक्षक राजेश डोंगरे यांनी लाचेची मागणी केल्याचं निष्पन्न झालं. त्यातच शनिवारी तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचं पथकं कोनगाव पोलीस ठाण्यात दाखल झालं. त्यांनी सापळा रचून पोलीस अधिकारी राजेश डोंगरे यांना १० हजार रुपये घेताना ताब्यात घेतले व नंतर अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दोन दिवसांची पोलीस कोठडी : "राजेश डोंगरे कार्यरत असलेल्या पोलीस ठाण्यातच त्यांच्यावर लाचखोरीचा गुन्हा दाखल केला आहे. रविवारी सुट्टीच्या दिवशी डोंगरे यांना न्यायालयात हजर केलं असता दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली," अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नेताराम म्हस्के यांनी दिली.
हेही वाचा :