सातारा : बांगला देश मुक्तीसाठी १९७१ मध्ये झालेल्या भारत-पाक युद्धामध्ये भारतीय सैन्य दलाच्या ताफ्यातील रशियन बनावटीचा 'टी ५५ रणगाडा' हा पाकिस्तानी सैन्याचा कर्दनकाळ ठरला होता. हाच रणगाडा रविवारी पहाटे साताऱ्यात दाखल झालाय. साताऱ्यातील सुभाषचंद्र बोस चौकामध्ये हा रणगाडा बसविण्यात आला असून उद्या (सोमवारी) खासदार उदयनराजेंच्या हस्ते त्याचं अनावरण होणार आहे.
उदयनराजेंच्या पाठपुराव्याला यश : सातारा जिल्ह्याला स्वातंत्र्य लढ्याची पार्श्वभूमी आहे. त्याच बरोबर देशसेवेचीही मोठी परंपरा आहे. लष्करी सेवेची ओळख वृद्धिंगत व्हावी, तरूणांना प्रेरणा मिळावी म्हणून खासदार उदयनराजे भोसले यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे टी ५५ या रणगाड्याची मागणी केली होती. सातत्याच्या पाठपुराव्यानंतर अखेर हा रणगाडा साताऱ्यात दाखल झाला.
सुभाषचंद्र बोस चौकाची वाढली शान : हुतात्मा स्मारकासमोरील दौलतनगर करंजे आणि सदर बाजार या भागांना जोडणाऱ्या सुभाषचंद्र बोस चौकाच्या मधोमध क्रेनच्या सहाय्याने टी ५५ हा रणगाडा पहाटे बसवण्यात आला. यावेळी खासदार उदयनराजे स्वतः उपस्थित होते. सोमवारी (२४ फेब्रुवारी) खासदार उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसाचे औचित्य साधून रणगाड्याचं अनावरण केलं जाणार आहे.
टी ५५ रणगाड्याचं वैशिष्ट्य काय? : भारत-पाकिस्तानमध्ये १९७१ साली झालेल्या युध्दात टी ५५ या रशियन बनावटीच्या रणगाड्यांनी पाकिस्तानचे ५८ रणगाडे नष्ट केले होते. एका अर्थानं टी ५५ हा रणगाडा पाकिस्तानी सैन्यासाठी कर्दनकाळ ठरला होता. तसंच सन १९६० ते १९८० या काळात सीमा रेषेवर या रणगाड्यांनी पाकिस्तानी सैन्य दलासमोर चांगलाच दबदबा राखला होता.
हेही वाचा -