मुंबई : अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा विभागानं केला आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं 4 जणांना अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रँच युनिट १२ ला मुंबईतील बोरिवली पश्चिमेमधील झा मार्गावर बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमध्ये बनावट कॉल सेंटरद्वारे अमेरिकन नागरिकांची फसवणूक होत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे बोरिवली इथल्या अर्पण अपार्टमेंटमध्ये छापा टाकण्यात आला. या कारवाईत चार जणांना अटक करून २ लाख ४१ हजार रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
अशी करायचे फसवणूक : "बनावट कॉल सेंटरमधून अमेरिकन नागरिकांना प्रथम कॉल केला जायचा. यानंतर, त्या परदेशी नागरिकाला सांगितलं जायचं की, ते सध्या संगणक किंवा लॅपटॉप वापरत आहेत, त्याच्या सॉफ्टवेअरमध्ये समस्या आहे. हा प्रॉब्लेम ऑनलाईन पद्धतीनं दूर करता येतो. मात्र, त्यासाठी तुम्हाला आधी पेमेंट करावं लागेल, अस सांगितलं जायचं. हे घोटाळेबाज अमेरिकन नागरिकांना मायक्रोसॉफ्टशी संबंधत कंपनीतून बोलत असल्याचं सांगून टोल फ्री क्रमांकावर कॉल करून त्यांच्याकडून बँकेचे तपशील मागायचे. एकदा का समोरच्या सर्व डिटेल्स दिले की, बँकेतून सर्व पैसे साफ केलं जायचे. "अशी माहिती पोलिसांच्या क्राईम ब्रँच युनिटनं दिली.
चार आरोपींना अटक : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "सदर बनावट कॉल सेंटरमधून अमेरिकेतील नागरिकांना फोन करून त्यांच्या संगणकातील मायक्रोसॉफ्टमध्ये बिघाड असल्याचं सांगितलं जायचं. मायक्रोसॉफ्ट अपडेट करण्याच्या बहाण्यानं अमेरिकेतील नागरिकांची फसवणूक केली जायची. या छापेमारीत पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून 6 लॅपटॉप, 20 मोबाईल, 2 वायफाय राउटर आणि 6 स्पीकर असा सुमारे 2 लाख 41 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी आयटी कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आहे."
तीन आरोपी 'हिस्ट्री शीटर' : अक्षत सुराणा, अभिषेक गुप्ता, दीपेन धनवानी आणि टिळक जोशी आशिया अशी चार आरोपींची नावं आहेत. या चारही आरोपींना न्यायालयानं 24 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यातील दीपेश धनवानी वगळता उर्वरित तिघे 'हिस्ट्री शीटर' असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, या कारवाईत आतापर्यंत एकूण किती अमेरिकन नागरिकांची फसवणूक झाली? तसंच, या ऑनलाईन हेराफेरीतून किती रुपये लुटले? याचा तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा :