मुंबई : महाराष्ट्र शासनाने 'मराठा लष्करी भूप्रदेश' या संकल्पनेअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना 'युनेस्को'च्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यासाठी प्रस्ताव सादर केलाय. या किल्ल्यांमध्ये रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी किल्ला आणि तामिळनाडूतील जिंजी किल्ला यांचा समावेश आहे. याबाबतचं सादरीकरण पूर्ण क्षमतेनं प्रभावीपणे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार हे शिष्टमंडळ गेलं आहे.
प्रस्ताव 'युनेस्को'कडं पाठवला : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड किल्ल्यांचा राज्य शासनाचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युनेस्कोकडं पाठवला. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आणि सादरीकरणासाठी जाण्याची संधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मंत्री शेलार यांनी आभार मानले.
२२ ते २६ फेब्रुवारी दरम्यान शिष्टमंडळ फ्रान्स येथे : या प्रस्तावाच्या अनुषंगाने, महाराष्ट्र शासनाचे चार सदस्यांचं शिष्टमंडळ २२ ते २६ फेब्रुवारी २०२५ दरम्यान पॅरिस आणि फ्रान्स येथे आहे. या शिष्टमंडळाचे नेतृत्व सांस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार करणार आहेत. इतर सदस्यांमध्ये अपर मुख्य सचिव विकास खारगे, पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे उप संचालक हेमंत दळवी आणि वास्तुविशारद श्रीमती शिखा जैन यांचा समावेश आहे.
किल्ल्यांना जागतिक स्तरावर ओळख मिळण्यास मदत : या शिष्टमंडळाच्या पॅरिस दौऱ्याद्वारे, या किल्ल्यांना जागतिक वारसा दर्जा मिळविण्यासाठी आवश्यक तांत्रिक आणि राजनैतिक सादरीकरण करण्यात येईल. यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांना जागतिक स्तरावर ओळख मिळण्यास मदत होईल आणि महाराष्ट्रातील सांस्कृतिक वारशाचं महत्त्व अधोरेखित होईल, अशी आशा आशिष शेलार यांनी व्यक्त केली.
पर्यटन विकासासाठी अधिक संधी उपलब्ध : युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाल्यास, या किल्ल्यांचं जतन, संवर्धन आणि पर्यटन विकासासाठी अधिक संधी उपलब्ध होतील. ज्यामुळं स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि सांस्कृतिक वारशाचं जतन सुनिश्चित होईल, असं आशिष शेलार यांनी सांगितलं.
हेही वाचा -
- साताऱ्यात शिवजयंती दिमाखात साजरी, मिरवणुकीत मर्दानी खेळांचा थरार, पाहा व्हिडिओ
- पुण्यात अवतरली शिवशाही : शिवछत्रपतींना सरदारांच्या वंशजांकडून भव्यदिव्य मानवंदना, हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी
- "या भूमंडळी हैसा राजा पुन्हा होणे नाही"; शेतकरी चित्रकारानं भाकरीवर रेखाटली शिवरायांची हुबेहूब प्रतिमा, पाहा व्हिडिओ