अमरावती : आपण परदेशी विद्यापीठांशी भागीदारी करून विद्यार्थ्यांसाठी बाजारपेठेच्या मागण्या पूर्ण करणारे नाविन्यपूर्ण कार्यक्रम देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इटलीचे राजदूत, रशियन संसदेचे अध्यक्ष, जपानी वाणिज्यदूत आणि इतर आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींसोबतच्या माझ्या बैठकीत मला कळलं की, अनेक देशांना भारतातील विविध क्षेत्रातील कुशल व्यावसायिकाची गरज आहे. तथापि, ते विशेषतः अशा तरुणांच्या शोधात आहेत, जे त्यांच्या भाषेमध्ये पारंगत आहेत. पदवीधर विद्यार्थ्यांना जपानी, जर्मन, फ्रेंच, रशियन, इटालियन, स्पॅनिश किंवा इतर कोणतीही परदेशी भाषा शिकण्याचं आवाहन राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी केलं. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या 41व्या दीक्षांत समारंभात राधाकृष्णन बोलत होते.
अभिजात भाषेतील विविध बोलींचं व्हावं जतन : "मी अमरावतीत असताना, भारत सरकारनं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा केली. माझ्या राज्यपालपदाच्या कार्यकाळात मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, हे माझ्यासाठी सन्मानाचं आणि भाग्याचं आहे. तामिळ भाषेला दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयीजी यांनी अभिजात भाषेचा दर्जा दिला, तर मराठीला पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी अभिजात भाषेचा दर्जा दिला. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विशेष आभार व्यक्त करतो. मराठी ही अशी भाषा आहे, ज्यामध्ये स्वराज्यरक्षक छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज संवाद साधत असतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी अधिकृत कामासाठी मराठीचा वापर केला, ज्यामुळं तिला राजेशाही दर्जा मिळाला. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, संत जनाबाई, संत गाडगे बाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी मराठी भाषेत विपुल लेखन आणि उपदेश केलं. वऱ्हाडी, मराठीची एक बोली ऐकायला गोड आहे आणि थेट मनाला स्पर्श करते. भाषेसोबतच आपण या महान अभिजात भाषेच्या विविध बोलींचा अभ्यास आणि जतन केला पाहिजे", असं राज्यपाल सीपी राधाकृष्णन म्हणाले.
विद्यार्थ्यांच्या हितांना प्राधान्य देण्याचा आवाहन : "राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चा उद्देश एक समग्र, लवचिक आणि बहुविद्याशाखीय शिक्षण प्रणाली तयार करणं आहे, जी नवोपक्रम, गंभीर विचार आणि सामाजिक जबाबदारीला प्रोत्साहन देते. मला आशा आहे की, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ इतर विद्यापीठांसाठी धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एक नमुना तयार करेल. कुलगुरूंशी चर्चा करताना, मी सातत्यानं वार्षिक शैक्षणिक दिनदर्शिका तयार करण्याच्या आणि त्याचं पालन करण्याच्या महत्त्वावर भर दिला. प्रत्येक विद्यार्थी आणि शिक्षकाला हे आधीच माहित असलं पाहिजे की, सत्र परीक्षा आणि अंतिम परीक्षा कधी सुरू होतील, निकाल कधी जाहीर होतील आणि दीक्षांत समारंभ कधी होईल. मी विद्यापीठांना विद्यार्थ्यांच्या हितांना प्राधान्य देण्याचं आवाहन करतो". असं देखील राज्यपाल म्हणाले.
या मान्यवरांची उपस्थिती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या 41 दीक्षांत समारंभात 38 हजार विद्यार्थ्यांना पदवी बहाल करण्यात आली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई, कुलगुरू प्रा.डॉ. मिलिंद बाराहाते व्यवस्थापन, सिनेट आणि विद्वत्त परिषदेचे सदस्य यासह विद्यापीठाचे अधिकारी निमंत्रित प्राध्यापक पदवीधर विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांचे कुटुंबीय प्रामुख्यानं उपस्थित होते.
हेही वाचा -
- अमरावती विद्यापीठात आता 'हिरकणी कक्ष'; स्तनपान करण्यासाठी स्वतंत्र खोली
- 'आंबेडकर थॉट्स'चा वर्ग सुरू असताना विद्यापीठ परिसरात दिसला वाघ, प्रशासनाकडून सावधतेचा इशारा
- Dr Babasaheb Amebdkar Jayanti: अमरावती विद्यापीठ येथे बाबासाहेबांच्या आयुष्यावर संशोधन; आंबेडकर यांच्या जीवनाच्या विविध पैलूंची माहिती उपलब्ध