मुंबई : बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची गेल्या महिन्यात निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणावरुन महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच पेटून उठलंय. मागील काही दिवसांपासून या प्रकरणात मोर्चे, आंदोलन, बंद पुकारले जात असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात एसआयटी गठीत करून चौकशीचे आदेश दिले. मात्र, ही समिती आता बरखास्त करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलीय.
काय म्हणाल्या अंजली दमानिया? : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी दमानिया यांनी संतोष देशमुख हत्येशी संबंधित खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड आणि स्थानिक पोलिसांचे संगनमत असल्याचा आरोप केला. तसंच तपासाच्या निष्पक्षतेवर याचा परिणाम होऊ शकतो, असा दावाही त्यांनील केला. "बीड जिल्ह्यातील कोणताही पोलीस अधिकारी देशमुख खून प्रकरणाचा निष्पक्ष तपास करू शकत नाही. कारण, एक तर ते कराड यांच्यासाठी स्पॉट आहेत किंवा कराड यांच्या कृपेनं त्यांना पद मिळालंय. त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी एसआयटी विसर्जित करावी. इतर जिल्ह्यातील अधिकारी तपासासाठी आणावेत, अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे केली", असं अंजली दमानिया म्हणाल्या.
पुढं त्या म्हणाल्या, "बीडमधील हत्या प्रकरणाचा सर्व तपास व्हिडिओ कॅमेऱ्यांसमोर व्हायला हवा. या संपूर्ण चौकशीचे व्हिडिओ चित्रीकरण व्हायला हवं. कारण, लोकांचा सीआयडी किंवा इतर पोलीस युनिटवर विश्वास नाही. त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे ऑडिओ व्हिडिओ चित्रीकरण करण्याचे आदेश द्यावेत", अशी मागणी देखील अंजली दमानिया यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडं केली. तसंच परळी औष्णिक प्रकल्पातून फ्लाय ॲश घेऊन जाणारे ट्रक नंबरप्लेटशिवाय धावत असून यात करोडो रुपयांचा घोटाळा, अव्यवहार असल्याची शंका आहे. त्यामुळं या राखेच्या व्यापाराची देखील सखोल चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही त्यांनी केलीय.
निष्पक्ष चौकशीसाठी मुंडेंना हटवावं : वाल्मिक कराड यांच्यामागे मंत्री धनंजय मुंडे यांचा हात असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून केला जातोय. तसंच धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणीही केली जात आहे. सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यात एक तास चर्चा झाली. मात्र, बीड प्रकरणावर कोणतीही चर्चा झाली नसल्याचं धनंजय मुंडे यांनी सांगितलं. याबाबत विचारण्यात आलं असता अंजली दमानिया म्हणाल्या की, "पवारांनी काही वर्षांपूर्वी भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळं राजीनामा दिला होता. त्यामुळं निष्पक्ष चौकशीसाठी मुंडे यांना हटवावं."
हेही वाचा -