मुंबई Pm Modi On Uddhav Thackeray : लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे पार पडले असून तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान पार पडणार आहे. देशभरात निवडणुकीचे एकूण सात टप्पे पार पडणार असून 4 जून या दिवशी निकाल लागणार आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचार शिगेला पोहोचला असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या जात आहेत. या प्रचारात अनेक ठिकाणी भावनिक मुद्दा हा सुद्धा प्रचाराचा प्रमुख मुद्दा बनला आहे. याच अनुषंगानं महाराष्ट्र राज्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या फोडाफोडीनंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना भावनिक मुद्द्याच्या आधारे जनतेची साथ मिळेल, अशी अपेक्षा असताना आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विषयाला बगल दिली. तर दुसरीकडं ठाकरे परिवारासाठी आपण अडचणीच्या काळात सर्वात अगोदर धावून जाणारी व्यक्ती असू, असा भावनिक मुद्दा उपस्थित करत उद्धव ठाकरे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.
नेमकं काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी ? :एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "राज्यात एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या बंडानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं माझ्यावर खूप प्रेम होतं. साहेबांची ती आपुलकी, प्रेम हे मी कधीही विसरु शकत नाही. आजच्या घडीला महाराष्ट्रात आमचे सर्वाधिक आमदार असूनही आम्ही मुख्यमंत्रीपद शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना दिलं. माझ्याकडून हीच बाळासाहेब ठाकरेंना वाहिलेली ही एक आदरांजली आहे. उद्धव ठाकरे हे काही माझे शत्रू नाहीत. तसेच बाळासाहेब ठाकरेंवर माझी खूप श्रद्धा आहे, मी त्यांचा आजही आदर करतो आणि यापुढं आयुष्यभर करत राहीन," असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. "बाळासाहेब ठाकरेंचं माझ्यावर खूप ऋण आहेत, म्हणूनच उद्धव ठाकरेंनी माझ्यावर कितीही टीका केली तरीही त्यांना मी उत्तर देणार नाही," असंही मोदी म्हणाले आहेत. तसेच "महाराष्ट्रात औरंगजेबाचं कौतुक करणाऱ्यांबरोबर केवळ सत्तेसाठी उद्धव ठाकरे जाऊन बसले, हे लोकांना मुळीच पटलेलं नाही. याकरता भावनिकदृष्ट्या जनता भाजपासोबत आहे. बाळासाहेब ठाकरेंनी इतक्या मेहनतीनं पक्ष उभा करत एक विचारधारा घेऊन महाराष्ट्र चालवला. ती विचारधारा सोडून उद्धव ठाकरे फक्त सत्तेसाठी काँग्रेस बरोबर गेले? हे जनतेला मुळीच पटलेलं नसून जनता यांना माफ करणार नाही," असंही मोदी म्हणाले आहेत.