सातारा (कराड) : विधानसभा निकालात महायुतीला सर्वात जास्त जागा मिळाल्या आहेत. या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी कराड येथे पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. "'लाडकी बहीण योजने'बाबत महाविकास आघाडीविरोधात महायुतीनं खोटा प्रचार केला. त्यामुळं महिलांनी आमच्याविरोधात मतदान केलं," असं म्हणत शरद पवार यांनी पराभवाचं एक कारण सांगितलं. "योगी आदित्यनाथांच्या 'बटेंगे तो कटेंगे', या घोषणेमुळं मतांचं ध्रुवीकरण झालं. आमचा पराभव झाला असला तरी लोकांमध्ये जाऊन पुन्हा नव्यानं उभं राहू," असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
अजून जोमानं काम करणार : "आमच्या अपेक्षेप्रमाणे निकाल लागला नाही. हा लोकांनी दिलेला निर्णय असून आम्हाला तो मान्य आहे. लोकसभेच्या निकालानंतर आम्हाला जास्त विश्वास होता. आता परत जोमानं कामाला लागणार आहोत. तळागाळात जाऊन अजून चांगलं काम करणार आहोत. अधिकृत आकडेवारी आल्यावर त्याचा अभ्यास आणि विश्लेषण करणार आहोत," असं शरद पवार म्हणाले.
महिलांनी विरोधात मतदान केलं : 'लाडकी बहीण योजने'बाबत शरद पवार म्हणाले की, "महायुतीनं 'लाडकी बहीण योजने'बाबतचा खोटा प्रचार केला. हे सरकार गेलं तर महाविकास आघाडी लाडकी बहीण योजना बंद करेल, असा खोटा प्रचार महायुतीनं केला. त्यामुळं महिलांनी आमच्याविरोधात मतदान केलं असल्याचं काही कार्यकर्त्यांनी मला सांगितलं. त्यामुळं याचा फटका आम्हाला बसला असावा."
'ईव्हीएम'वर बोलण्यास नकार : निकालानंतर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी 'ईव्हीएम'वर प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर शरद पवार म्हणाले की, "याबाबत अधिकृत माहिती नसल्यामुळं मी 'ईव्हीएम' मशीनवर भाष्य करणार नाही. अधिकृत माहिती घेवून मी याबाबत अधिक बोलेन." "कटेंगे तो बटेंगे'मुळं मतांचं धुर्वीकरण झालं," असं म्हणत शरद पवारांनी योगी आदित्यनाथांना टोला लगावला.
अजित पवार - युगेंद्र पवार तुलना होऊ शकत नाही : "अजित पवार यांना जास्त जागा आल्या हे मान्य करणं गैर नाही. मी बारामतीत उमेदवार दिला नसता तर वेगळा मेसेज बाहेर गेला असता. तसंच नवखा उमेदवार आणि अनुभवी उमेदवार लढत याबाबत आम्हाला कल्पना होती. त्यामुळं अजित पवार आणि युगेंद्र पवार यांची तुलना होवू शकत नाही," असं म्हणत शरद पवार यांनी युगेंद्र पवार यांचा झालेला पराभव मान्य केला.
विरोधी पक्षनेता असणं कधीही चांगलं : पराभवानंतर शरद पवार घरी बसतील, अशी टिप्पणी त्यांचे काही विरोधक करत आहेत. त्यावर शरद पवार म्हणाले, "मी काही घरी बसणार नाही. काल निकाल लागला आणि आज मी कराडमध्ये आहे. दिल्लीतील अधिवेशन झाल्यानंतर लगेच राज्यात येवू पुन्हा जोमानं कामाला लागणार आहेत." विरोधी पक्षनेते पदाबाबतही शरद पवार यांनी भाष्य केलं. "विरोधी पक्षनेता असणं कधीही योग्य आहे. ती फिगर आमच्याकडे नाही. त्यामुळं विरोधी पक्षनेता द्यायचा की नाही हा सरकारचा निर्णय आहे," असं शरद पवार म्हणाले.
हेही वाचा
"अजित पवारांचा स्ट्राइक रेट खूप चांगला", मुख्यमंत्रिपदाबाबत छगन भुजबळांनी स्पष्टच सांगितलं
राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच विरोधी पक्षनेत्याविना चालणार सभागृह? जाणून घ्या कारण...