पुणे : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीनं एकतर्फी बाजी मारल्याचं चित्र दिसत आहे. पुणे शहरातील आठ विधानसभा मतदार संघापैकी 7 जागांवर महायुतीनं घवघवीत यश मिळवलं आहे. तर एका जागेवर महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी झाल्याचं पाहायला मिळालं.
पुणे शहरातील कसबा, कोथरूड, शिवाजीनगर, पर्वती, हडपसर, खडकवासला,आणि पुणे कँटोन्मेंट या मतदार संघात महायुतीचे उमेदवार हे विजयी झाले आहेत. तर वडगाव शेरी मतदार मतदार संघात फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) उमेदवार बापूसाहेब पठारे हे विजयी झाले आहेत.
कसबा मतदार संघ : पुण्यातील कसबा मतदार संघ हा भाजपाचा बालेकिल्ला असताना दोन वर्षांपूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी हा गड जिंकला होता. मात्र, त्यानंतर सातत्यानं गेली 2 वर्ष हेमंत रासने यांनी लोकांमध्ये जाऊन काम केलं. त्याचा फायदा त्यांना या निवडणुकीत झाला. हेमंत रासने यांनी या निवडणुकीत काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांचा 19 हजारांहून अधिक मतांनी पराभव करत विजय मिळवला.
- कोथरूड मतदार संघ : या मतदार संघात राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील विरुद्ध शिवसेना (उबाठा) उमेदवार चंद्रकांत मोकाटे अशी लढत पाहायला मिळाली. यात 1 लाख 11 हजार मतं मिळवत चंद्रकांत पाटील हे विजयी झाले आहेत.
- पर्वती मतदार संघ : पुण्यातील पर्वती मतदार संघातून चौथ्यांदा आमदार माधुरी मिसाळ या विजयी झाल्या आहेत. या मतदारसंघात आमदार माधुरी मिसाळ विरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (शरदचंद्र पवार) उमेदवार अश्विनी कदम यांच्यात लढत होती.
खडकवासला मतदार संघ : पुणे शहरातील खडकवासला मतदार संघात भारतीय जनता पक्षाकडून भीमराव तापकीर तर दुसरीकडं राष्ट्रवादी काँग्रेसकडून (शरदचंद्र पवार) सचिन दोडके यांच्यात लढत झाली. या लढतीत जनतेनं भीमराव तापकीर यांच्या गळ्यात चौथ्यांदा आमदारकीची माळ टाकली आहे. भाजपाचे भीमराव तापकीर हे जवळपास 37 हजार मतांनी विजयी झाले आहेत.
शिवाजीनगर मतदारसंघ : पुण्यातील शिवाजीनगर मतदार संघात भाजपाचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे हे दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत. या मतदारसंघात काँग्रेसकडून दत्ता बहिरट तर भाजपाकडून सिद्धार्थ शिरोळे आणि अपक्ष उमेदवार मनीष आनंद यांच्यात लढत झाली. यात 36 हजार 814 मतांनी भाजपाचे सिद्धार्थ शिरोळे हे विजयी झाले आहे.
- पुणे कँटोन्मेंट : पुण्यातील पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे सुनील कांबळे हे 10 हजार 320 मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी दुसऱ्यांना काँग्रेसचे उमेदवार रमेश बागवे यांचा पराभव केलाय.
- हडपसर मतदार संघ : हडपसर विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चेतन तुपे हे पुन्हा एकदा विजयी झाले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) उमेदवार प्रशांत जगताप यांचा पराभव केलाय. हडपसर मतदार संघातून तुपे हे जवळपास 6 हजार मतांनी विजयी झाले आहेत.
- वडगाव शेरी मतदार संघ : वडगाव शेरी विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार बापूसाहेब पठारे हे 4000 मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार सुनील टिंगरे यांचा पराभव केलाय.
हेही वाचा -