नाशिक - खासगी बस दरीत कोसळल्यानं सापुतारा घाटात भीषण अपघात झाला. अपघातात 7 भाविक जागीच ठार झाले आहेत. तर 15 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. बस घाटात कोसळल्यानं बसचे दोन तुकडे झाले आहेत. भाविक नाशिकहून देवदर्शन करून गुजरातकडे जात असताना अपघात झाला. अपघात झालेल्या बसमधील सर्व प्रवासी हे मध्यप्रदेशमधील रहिवाशी आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुजरातमधील डांग जिल्ह्यात रविवारी पहाटे भाविकांना घेऊन जाणारी खासगी बस खोल दरीत कोसळल्यानं सात जणांचा मृत्यू झाला. तर 15 जण गंभीर जखमी झाले आहेत. सापुतारा हिल स्टेशनजवळ बसच्या चालकाचं स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्यानं अपघात झाला, असे प्रभारी पोलीस अधीक्षक एस. जी. पाटील यांनी सांगितलं. 48 यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस क्रॅश बॅरियर तोडून थेट दरीत कोसळली.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस अधिकारी आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी घटनास्थळी पोहोचले. अपघाताचे नेमकं कारण शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. अपघातग्रस्त बस उत्तर प्रदेशातील आहे. जखमीपैकी एकाला सुरत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आलं आहे. रतनलाल जाटव, भोलाराम कोसावा, बिजरौनी यादव (पप्पू), गुरीबाई राजेश यादव, कमलेशबाई बिरपाल यादव, भोई राम कोरसावा ही जखमी झालेल्या प्रवाशांची नावे आहेत.
गुजरातला जाणार होते भाविक- जखमींना अहवा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. काहींना किरकोळ दुखापत झाली आहे. बचावकार्य जवळजवळ पूर्ण झाल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. 48 भाविकांना घेऊन जाणारी बस त्र्यंबकेश्वरहून गुजरातमधील द्वारका येथे जात होती, असे त्यांनी सांगितले. जखमी आणि मृत हे मध्यप्रदेशातील गुना, शिवपुरी आणि अशोक नगर जिल्ह्यातील होते, असे अधिकाऱ्यानं सांगितलं.
हेही वाचा-