पाटणा- राष्ट्रपतींवरील आक्षेपार्ह टिप्पणी करणं काँग्रेसच्या (sonia gandhi remark on president) माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना महागात पडण्याची चिन्हे आहेत. बिहारमधील वकिलानं सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरुद्ध बिहारमधील मुझफ्फरपूर न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाची १० फेब्रुवारीला न्यायालयात सुनावणी होणार आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भाषण केल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी राष्ट्रपतींबद्दल अत्यंत आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप आहे. मुझफ्फरपूरचे वकील सुधीर कुमार ओझा यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी-वड्रा यांच्याविरुद्ध सीजेएम न्यायालयात तक्रार दाखल केली. लहलादपूर पटाही येथील रहिवासी, याचिकाकर्ता वकील सुधीर यांनी तक्रारीबाबत माहिती दिली. त्यांनी म्हटलं, "काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रपतींबद्दल त्यांनी केलेली टिप्पणी योग्य नाही. त्यांनी केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीबाबत सीजेएम न्यायालयात १० फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे."
२ वर्ष ते ७ वर्षांपर्यंत होऊ शकते शिक्षा- पुढे याचिकाकर्ता म्हणाले, " मुझफ्फरपूर न्यायालयात सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्याविरुद्ध फौजदारी खटला दाखल केला आहे. या तिन्ही आरोपींनी अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान राष्ट्रपतींवर टिप्पणी करण्याचा कट रचला आहे. राष्ट्रपती एक महिला आणि आदिवासी वर्गातून आलेल्या असताना त्यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे. न्यायलयानं माझी याचिका स्वीकारली आहे. दाखल करण्यात आलेले आरोप सिद्ध झाले तर आरोपींना २ वर्ष ते ७ वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते."
राष्ट्रपती पदाचा अवमान- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना 'बिचारी महिला' म्हटल्याबद्दल गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी नुकतेच काँग्रेसच्या खासदार सोनिया गांधींवर टीका केली. ते म्हणाले, "काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी राष्ट्रपती पदाचा अवमान केला आहे. घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीला अशा प्रकारे संबोधित करणं, हा केवळ त्या व्यक्तीचाच नाही तर देशाचा अपमान आहे. सोनिया गांधींनी संपूर्ण देशाची माफी मागावी."
सोनिया गांधींनी काय म्हटलं होतं?- संसदेबाहेर माध्यमांशी बोलताना सोनिया गांधींनी राष्ट्रपतींना 'बिचारी महिला' म्हटलं होतं. "राष्ट्रपतींना शेवटपर्यंत खूप थकल्यासारखं वाटत होतं. त्या निरुपयोगी भाषण वाचूच शकत नव्हत्या," असेदेखील सोनिया गांधींनी म्हटलं होतं. सोनिया गांधी हे वक्तव्य करत असताना राहुल गांधी आणि प्रियांका गांधीदेखील उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सोनिया गांधींच्या वक्तव्यावर तीव्र हल्लाबोल केला होता.
हेही वाचा-