पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची आज (2 फेब्रुवारी) महाराष्ट्र गट ब (अराजपत्रीत) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. मात्र, या परीक्षेअगोदर महाराष्ट्रातील नाशिक आणि पुणे या भागातील काही विद्यार्थ्यांना 'एमपीएससी परीक्षेची प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका देतो, त्यासाठी 40 लाख रुपये लागतील' असे फोन कॉल करण्यात आले होते. या प्रकरणी दोघांना गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे.
दिपक दयाराम गायधने (वय 26) आणि सुमित कैलास जाधव (वय 23) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. या दोघांना चाकण येथून अटक करण्यात आली आहे. तर या प्रकरणातील मुख्य आरोपी योगेश सुरेंद्र वाघमारे याला नागपूर पोलिसांच्या मदतीनं ताब्यात घेण्यात आलंय.
40 लाखांची केली मागणी : पुणे आणि नाशिक भागातील एमपीएससीच्या काही विद्यार्थ्यांना 'परीक्षेची प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका देतो, त्यासाठी 40 लाख रुपये द्या' असे कॉल आल्याची माहिती लोकसेवा आयोगानं दिली. त्यानंतर याप्रकरणी गुन्हे शाखेनं तत्काळ चौकशी सुरू केली. चौकशी दरम्यान चाकण येथील दोघजणं असे कॉल करत असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर दिपक गायधने आणि सुमित जाधव या दोघांना चाकण येथून ताब्यात घेण्यात आलं. चौकशी दरम्यान हे कॉल त्यांनीच केल्याचं त्यांनी कबुल केलं.
24 उमेदवारांची यादी : यासंदर्भात अधिक माहिती देत पोलीस उपायुक्त निखील पिंगळे यांनी सांगितलं, "याप्रकरणी अधिक चौकशी केली असता दिपक गायधने आणि सुमित जाधव या दोघांना मुख्य आरोपी योगेश वाघमारे यानं नाशिक येथील 24 उमेदवारांची यादी दिल्याचं समोर आलं. या यादीतील नांदगाव नाशिक येथील दोन विद्यार्थ्यांना फोन कॉल करण्यात आल्याचं तपासात निष्पन्न झालंय. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर मुख्य आरोपी योगेश वाघमारे याला नागपूर गुन्हे शाखेच्या मदतीनं ताब्यात घेण्यात आलंय. तर, संशयितांकडं उमेदवारांच्या याद्या कशा प्राप्त आल्या? तसंच या यादीतील उमेदवार यावर्षी परीक्षेला बसलेले आहेत का? याबाबत तपास सुरू आहे. मात्र, अद्याप पर्यंतच्या तपासात एमपीएससीचा पेपर फुटल्याबाबत काहीही निष्पन्न झालेलं नाही."
हेही वाचा -
- 'एमपीएससी'ची प्रश्नपत्रिका लीक प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू; आयोगानं केलं 'हे' आवाहन
- MPSC च्या परीक्षेच्या नावांमधील बदल रद्द करा, जिल्हाधिकारी आक्रमक, आंदोलनाचा दिला इशारा - MPSC examination names
- 'पीएसआय' परीक्षा उत्तीर्ण होऊनही 'एमपीएससी'नं नोकरी नाकारली, तृतीयपंथी वीणा काशिदच्या संघर्षाला न्याय मिळणार का? - MPSC Rejected Transgender Job