सातारा : विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकरांचे चुलत बंधू तथा सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर आणि रघुनाथराजे यांच्या मुंबई, पुणे, फलटणमधील निवासस्थानी सलग चार दिवसांपासून इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांकडून तपासणी सुरू आहे. पुण्यातील तपासणी आज पूर्ण झाली, तर फलटणमधील तपासणीही रात्री संपणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
कारवाई रात्री संपेल, पेपर वर्क बाकी : इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकल्यापासून संजीवराजेंच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी गेली चार दिवस त्यांच्या निवासस्थानाबाहेर ठाण मांडलं आहे. संजीवराजेंच्या पत्नी शिवांजलीराजे नाईक-निंबाळकर आणि सुपूत्र सत्यजीतराजेंनी आज कार्यकर्त्यांशी संवाद साधला. सुदैवानं आज कारवाई संपेल. थोडं पेपर वर्क बाकी आहे, असं सांगत त्यांनी कारवाई रात्री संपणार असल्याचे संकेत दिलं.
पुण्यातील तपासणी संपली : संजीवराजेंच्या पुण्यातील निवासस्थानी सुरू असणारी तपासणी ५० तासांनंतर संपली. त्याठिकाणी इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांना काहीही आक्षेपार्ह आढळून आलेलं नाही. पुण्यानंतर आता फलटणमधील तपासणी देखील संपत आली आहे. रात्री उशीरा तपासणी पूर्ण होईल, असे संकेत शिवांजलीराजे नाईक-निंबाळकर यांनी दिले आहेत.
ना रोकड सापडली ना आयकर चुकवल्याचं आढळलं : धाडी टाकल्यानंतर इन्कम टॅक्स विभागाच्या अधिकाऱ्यांकडून गोविंद डेअरी, शिक्षण संस्थेसह व्यावसायिक कागदपत्रांची छाननी करण्यात आली. फलटण, पुणे अथवा मुंबई निवासस्थानी अधिकाऱ्यांना कोणतीही बेनामी रोकड सापडलेली नाही. तसंच इन्कम टॅक्स चुकवल्याचंही तपासणीत आढळून आलेलं नाही.
प्रत्येक गोष्टीचा आमच्याकडे हिशोब : प्रत्येक गोष्टींचा आमच्याकडं हिशोब आहे. त्यामुळं इन्कम टॅक्सच्या धाडीतून काही निष्पन्न होणार नसल्याचा दावा रघुनाथराजे नाईक-निंबाळकरांनी केला होता. आयकर विभागाचे अधिकारी अतिशय व्यवस्थित रेकॉर्ड तपासत आहेत. परंतु, त्यांचा राँग नंबर लागला असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दोन दिवसांपुर्वी दिली होती. ती प्रतिक्रिया खरी ठरताना दिसत आहे.
हेही वाचा :