मुंबई : विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळालं आहे. त्यामुळं आता सत्ता स्थापनेच्या हालचालीला वेग आला असून, महायुतीतील तिन्ही पक्षाकडून बैठकांचा धडाका सुरू असल्याचं चित्र आहे. दरम्यान, आज (24 नोव्हेंबर) मुंबईत देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत सागर बंगला येथे भाजपाची बैठक होत आहे. तर सायंकाळी शिंदे यांच्या शिवसेनेच्या आमदारांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत विधिमंडळ गटनेते पदाची निवड करण्यात येणार आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची मुंबईतील देवगिरी बंगल्यावर बैठक पार पडली. या बैठकीत पुढील रणनीती आणि अजित पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली. या निर्णयाला सर्व आमदारांनी एकमताने पाठिंबा दिला, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली.
अनिल पाटील प्रतोदपदी निवड : अजित पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाल्यानंतर अनिल पाटील यांची प्रतोदपदी निवड करण्यात आली. गेल्या सरकारमध्ये सुद्धा अनिल पाटील प्रतोदपदी होते. त्यांची नियुक्ती कायम ठेवण्यात आली आहे. देवगिरी बंगल्यावर पार पडलेल्या बैठकीत हे दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. तसेच राष्ट्रवादी पक्षाला किती मंत्रिपद मिळणार? आणि कोणती खाती मिळणार? याबाबतही बैठकीत खलबतं झाल्याची माहिती समोर येत आहे.
सोमवारी शपथविधी? : महायुतीला निवडणुकीत चांगले यश मिळाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळं त्यांचा आत्मविश्वास वाढला असून, सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आलाय. एक मुख्यमंत्री आणि दोन मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तसेच सोमवारी शपथविधी होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
पक्ष कुणाचा? हे स्पष्ट झालं : "राष्ट्रवादी पक्ष कुणाचा? याबाबत लोकांमध्ये कित्येक दिवसापासून संभ्रम होता. परंतु, आता निवडणुकीत घवघवीत यशानंतर राष्ट्रवादी पक्ष कोणाचा? हे आता स्पष्ट झालं आहे. जनतेमध्ये जो संभ्रम होता तो दूर झाला आहे. जनतेनेच आमच्या बाजूनं कौल दिल्यामुळं राष्ट्रवादी पक्ष हा अजित पवारांचाच आहे याच्यावर शिक्कामोर्तब झाला आहे," असं राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी सांगितलं. देवगिरीवरील बैठक संपल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला : "महायुतीतील देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार या सगळ्यांनीच मेहनत घेतली. महायुती सरकारनं अनेक योजना राबवल्या, चांगली कामे केली आणि आमच्या यशामध्ये लाडक्या बहिणीचा मोठा वाटा आहे. लाडकी बहीण या योजनेचा निर्णय घेतल्यानंतर ते थेट महिलांच्या खात्यात कसे पैसे पोहोचतील याची काळजी अजित पवार यांच्या अर्थखात्याने घेतली. त्यामुळं जनतेनं आमच्या बाजूनी कौल दिला. जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला आहे. महिलांनी मोठ्या प्रमाणात मतदान केलं. त्यांच्या मतांची टक्केवारी वाढली आहे," असं भुजबळ म्हणाले.
हेही वाचा -