पुणे : पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून गुलियन बॅरी सिंड्रोम (guillain barre syndrome pune) या आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचं बघायला मिळतंय. शहरात या आजाराचे 149 संशयित रुग्ण आढळून आले आहेत. मात्र, असं असतानाच ससून रुग्णालयातील पाच रुग्णांनी 'जीबीएस'वर यशस्वी मात केली आहे. पुष्पगुच्छ देऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
नागरिकांनी भीती बाळगू नये : यावेळी ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार म्हणाले की, "ससून रुग्णालयात जीबीएस आजाराचे 28 रुग्ण उपचार घेत आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून शहरात जीबीएसचे रुग्ण वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. मात्र, असं असलं तरी या आजाराचे पाच रुग्ण बरे झाले आहेत. त्यांना आज (शनिवारी) डिस्चार्ज मिळालाय. तर येत्या एक ते दोन दिवसात अजून दहा रुग्णांना डिस्चार्ज मिळणार आहे. त्यामुळं नागरिकांनी भीती बाळगू नये", असं पवार म्हणाले.
अशी घ्या काळजी : पुढं ते म्हणाले की,"नागरिकांनी पिण्याचं पाणी दुषित राहणार नाही, याची काळजी घेणं आवश्यक आहे. तसंच पाणी उकळून प्यावं, अन्न स्वच्छ आणि ताजे असावं. वैयक्तिक स्वच्छतेवर भर द्यावा. शिळे अन्न आणि अर्धवट शिजवलेले अन्न खावू नये. नागरिकांनी घाबरून न जाता या आजाराची लक्षणं आढळल्यास त्वरित शासकीय रुग्णालयात जावं", असं आवाहन देखील यावेळी डॉ. पवार यांनी केलं.
रुग्णांनी व्यक्त केला आनंद : यावेळी डिस्चार्ज मिळालेल्यांपैकी एका रुग्णानं सांगितलं की, "मला 23 जानेवारी रोजी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ससून रुग्णालयातील सर्व डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी विशेष काळजी घेतली. त्यामुळं मी लवकर बरा झालो." तर दुसऱ्या एका रुग्णांनं सांगितलं की, "मला रुग्णालयात आल्याबरोबर आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं. पण येथील डॉक्टरांनी मेहनत घेत आठ दिवसात मला बरं केलंय. आज आठव्या दिवशी रुग्णालयातून घरी जात असल्यानं खूप आनंद होतोय."
हेही वाचा -