मुंबई- विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बहुतांश एक्झिट पोलचे अंदाज चुकीचे ठरल्याचं स्पष्ट होत आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या यादीनुसार महायुतीनं 230 जागांवर विजय मिळविला आहे. यात भाजपानं 132, शिवसेनेनं 57, राष्ट्रवादी काँग्रेसनं 41 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा महायुती सत्ता स्थापन करणार आहे. दुसरीकडं वंचित बहुजन आघाडी, बसपा आणि मनसे या पक्षाचा एकही उमेदवार निवडून आला नाही.
20 नोव्हेंबर रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकूण 158 पक्षांनी निवडणूक लढवली होती. महायुतीला ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतर छोट्या पक्षांची अत्यंत निराशाजनक कामगिरी झाली.
- मनसेने 125 उमेदवार उभे केले होते. तर वंचित बहुजन आघाडीनं 200 उमेदवार रिंगणात उभे केले होते. दोन्ही पक्षांना विधानसभा निवडणुकीत भोपळादेखील फोडता आला नाही. निवडणुकीच्या निकालापूर्वीच प्रकाश आंबेडकर यांनी सत्तेत सहभागी होण्याची तयारी दाखविली होती. दुसरीकडं मुंबईतील माहीम जागेवर राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचादेखील पराभव झाला.
- बहुजन समाज पक्षानं 237 आणि आझाद समाज पक्षानं (कांशीराम) 28 जागांवर उमेदवार उभे केले. विधानसभा निवडणुकीत बसपाने सर्वाधिक उमेदवार उभे केले. दोन्ही पक्षांना एकाही जागेवर विजय मिळविता आला नाही. बहुजन समाज पक्षानं राज्यात भाजपापेक्षा उमेदवार रिंगणात उभे केले होते.
- राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी पक्षानं 19 उमेदवार उभे केले होते. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये राजू शेट्टींचा प्रभाव आहे. त्यांनादेखील निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला.
- प्रहार जनशक्तीचे संस्थापक बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील प्रहार जनशक्ती पक्षानंही 38 जागांवर निवडणूक लढविली. पण त्यांनादेखील एकही जागा जिंकता आली नाही. एवढेच नव्हेतर बच्चू कडूंचादेखील अचलपूर विधानसभा निवडणुकीत पराभव झाला.
या लहान पक्षांनी काही जागांवर मिळविला विजय
- समाजवादी पक्ष, जन सुराज्य शक्तीनं प्रत्येकी दोन जागा जिंकल्या आहेत. सीपीएम, एआयएमआयएम, राष्ट्रीय युवा स्वाभिमान पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, शेतकरी आणि कामगार पक्ष आणि राजश्री शाहू विकास आघाडी यांनी प्रत्येकी एक जागा जिंकली आहे.
विधानसभा सभागृहात असे असणार बलाबल
महायुती एकूण- 230
- भाजपा- 132
- शिवसेना - 57
- राष्ट्रवादी काँग्रेस-41
महाविकास आघाडी-46
- शिवसेना (उद्धव ठाकरे) - 20
- राष्ट्रवादी काँग्रेस( एसपी)-10
- काँग्रेस-16
भाजपा जनता पक्ष | 132 |
---|---|
शिवसेना | 57 |
राष्ट्रवादी | 41 |
शिवसेना (उद्धव ठाकरे) | 20 |
काँग्रेस | 16 |
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) | 10 |
समाजवादी पक्ष | 2 |
जनसुराज्य शक्ती पक्ष- JSS | 2 |
राष्ट्रीय युवा स्वाभिमान पार्टी - RSHYVSWBHM | 1 |
राष्ट्रीय समाज पक्ष - RSPS | 1 |
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन- AIMIM | 1 |
भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी)- CPI(M) | 1 |
भारतीय शेतकरी आणि कामगार पक्ष - PWPI | 1 |
राजर्षी शाहू विकास आघाडी- RSVA | 1 |
स्वतंत्र | 2 |
एकूण | 288 |
Source- https://results.eci.gov.in/ResultAcGenNov2024/partywiseresult-S13.htm
मुख्यमंत्री पदी कोण असणार? विधानसभा निवडणुकीत महायुती आघाडीनं ऐतिहासिक विजय मिळवून महाविकास आघाडीचा लाजिरवाणा पराभव केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सांगितले," राज्याच्या पुढील मुख्यमंत्र्याबाबत निर्णय घेतला जाईल. भारतीय जनता पक्ष (भाजपा), शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) या तीन पक्षांचे नेते एकत्रितपणे निर्णय घेणार आहेत." विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाल्यानंतर जागा चोरीला गेल्याचा आरोप शिवसेना (युबीटी) खासदार संजय राऊत यांनी केला. यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी कधी-कधी आत्मपरीक्षण करण्याची गरज असते, असे सांगून राऊत यांना टोला लगावला.
- पंतप्रधानांसह गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांचं केलं अभिनंदन-विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद साधून अभिनंदन केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले.
हेही वाचा-