मुंबई : सलमान खान याच्या घरावर गोळीबार आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात सहभागाचा आरोप असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याचा भाऊ अनमोल बिश्नोईच्या मुसक्या आवळण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आलं. कॅलिफोर्निया इथं लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याच्या मुसक्या आवळण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेला दिली. लॉरेन्स बिश्नोई हा गुजरातमधील साबरमतीच्या कारागृहात बंद आहे. मात्र त्याचे आर्थिक व्यवहार अनमोल बिश्नोई संभाळत असल्याचा पोलिसांचा आरोप आहे.
अनमोल बिश्नोई अनेक गुन्ह्यात वॉन्टेड :अनमोल बिश्नोई हा अनेक गुन्ह्यात सहभागी असल्याचा पोलिसांचा दावा आहे. अनेक खुनाच्या गुन्ह्यांमध्ये तो मोस्ट वॉन्टेड आरोपी आहे. अनमोल बिश्नोईला कॅलिफोर्नियात पकडण्यात आल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला. कॅनडातील हरदीपसिंग निज्जर या खलिस्तानवाद्याच्या हत्येप्रकरणी अनमोल बिश्नोईची चौकशी होण्याची शक्यता आहे. त्यासाठी अमेरिकन पोलीस अधिकारी त्याला कॅनडाच्या अधिकाऱ्यांकडं सोपवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यानंतर भारतीय सुरक्षा अधिकारी त्याला ताब्यात घेण्याची शक्यता आहे, असं मुंबई गुन्हे शाखेतील सूत्रांनी सांगितलं.
सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात वॉन्टेड :लॉरेन्स बिश्नोई याला अटक केल्यानंतर साबरमती कारागृहात बंद करण्यात आलं. मात्र त्याचा भाऊ अनमोल बिश्नोई हा अमेरिका आणि कॅनडा आदी देशात राहून गुन्हेगारी कारवाया करत असल्याचा आरोप सुरक्षा यंत्रणांकडून करण्यात येत आहे. अनमोल बिश्नोई गेल्या वर्षी भारतातून पळून जाण्यात यशस्वी झाला. लॉरेन्स बिश्नोई याच्या अटकेनंतर अनमोल हा बिश्नोई टोळीच्या गुन्हेगारी नेटवर्कमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारात 2022 मध्ये पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याच्या हत्येसह अनमोल भारतातील अनेक गुन्ह्यात मोस्ट वॉन्टेड आहे. ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येतही त्याचं नाव समोर आलं.