मुंबईJP Nadda Mumbai Visit :भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं दुपारी साडेबारा वाजता मुंबई विमानतळावर आगमन झाल्यानंतर मोठ्या जल्लोषात त्यांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी दादर येथील वसंत स्मृती या मुंबई भाजपा कार्यालयात मुंबई संचलन समिती बरोबर क्लस्टर बैठक घेतली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, मुंबईतील भाजपाचे खासदार, आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत त्यांनी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला.
लहान-लहान गोष्टींवर भर द्या:नड्डा यांनी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं पंतप्रधान मोदी यांचा 'अबकी बार ४०० पार' हा संकल्प प्रत्यक्षात उतरण्यासाठी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत लहान-लहान गोष्टींवर कशा पद्धतीनं लक्ष केंद्रित करावं लागणार आहे, याबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. सामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी जसा देश तसा वेश, यांचं अनुकरण करण्याचा त्यांनी कार्यकर्त्यांना मंत्र दिला. यासाठी त्यांनी स्वतःच्या वैयक्तिक जीवनातील काही उदाहरणंही सांगितली.
चुकीची माहिती निवडणूक आयोगाला देत राहा-मोदी सरकारनं आतापर्यंत केलेल्या कामांची माहिती कमीत कमी शब्दांमध्ये 'टू द पॉईंट' जनतेपर्यंत कशा पद्धतीनं पोचवण्यात येईल, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केलं. जे नवीन मतदार यंदा पहिल्यांदाच मतदान करणार आहेत, त्यांच्याबरोबर संपर्क करण्याचं आवाहनही त्यांनी केलं. तसेच सामान्य जनतेसोबत जोडण्यासाठी त्यांच्यामधीलच एका माणसाची निवड करायची, असा सल्लाही दिला. त्यासोबत विरोधकांकडून होणाऱ्या प्रत्येक चुकीची माहिती निवडणूक आयोगाला देत राहा, अशी सूचनाही नड्डा यांनी कार्यकर्त्यांना केली.