शिर्डी : जगभर नावलौकिक असलेल्या शिर्डी साईबाबा समाधी मंदिरात असलेल्या साईंच्या संगमरवरी मूर्तीची प्रतिकृती तयार करण्याकरिता थ्रीडी स्कॅनिंग करण्यात येणार आहे. तसंच गेल्या सत्तर वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेल्या इटालियन मार्बलमध्ये घडविण्यात आलेल्या या मूर्तीची सद्यपरस्थिती काय आहे, याचा नेमका अंदाज यावा यासाठी थ्रीडी स्कॅनिंग 20 डिसेंबर रोजी केलं जाणार असल्याची माहिती साईबाबा संस्थानच्या वतीनं देण्यात आलीय.
साईबाबांच्या मूर्तीची झीज : साईबाबांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आल्यानंतर प्रारंभीच्या काळात मूर्तीला दूध आणि पाण्यानं अंघोळ घातली जात होती. मात्र, त्यामुळं मूर्तीची हळूहळू झीज होऊ लागल्याचं निदर्शनास आलं. मार्बल हे नैसर्गिकदृष्ट्या थंड गुणधर्माचं असल्यानं गरम पाणी आणि दही-दुधामुळं त्याला हानी पोहोचते, असं तज्ञांनी स्पष्ट केलं. याची पाहणी केल्यानंतर तज्ञांनी काही सूचना केल्या आहेत. त्यानुसार काळजी घेण्यात येऊ लागली. मात्र, काळानुरुप मूर्तीची झीज सुरूच असल्याचं पुढं आलंय. त्यामुळं या मूर्तीचं थ्रीडी स्कॅनिंग करून तो डाटा संरक्षित झाला तरच भविष्यात सध्याच्या मूर्तीप्रमाणं भविष्यातदेखील मूर्ती पाहता येईल. तसंच हा डेटा वापरून तशीच हुबेहूब मूर्ती तयार करता येऊ शकेल, अशी संकल्पना पुढं आली आहे.
तज्ञांच्या समितीची नियुक्ती : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयातील तज्ञांमार्फत साईबाबा समाधी मंदिरातील साईबाबांच्या संगमरवरी मूर्तीचा थ्रीडी स्कॅनिंगद्वारे डाटा संरक्षित केला जाणार आहे. ही समिती 20 डिसेंबरला साई मंदिरास भेट देऊन थ्रीडी स्कॅनिंग करणार आहे. त्यामुळं दुपारी पावणेदोन ते साडेचार याकालावधीत साई मंदिर दर्शनासाठी बंद ठेवलं जाणार असल्याची माहिती साई संस्थानच्या वतीनं देण्यात आली आहे.
साईबाबांनी बसण्यासाठी वापरलेली शीळा, लाकडी पादुका, सटका आणि साईंनी वापरलेल्या अन्य सर्व वस्तूंचे संवर्धन करण्यासाठी आवश्यक असलेले लेपन आणि विशिष्ट रसायन लावण्याची प्रक्रिया तज्ञ मंडळींच्या देखरेखीखाली सध्या सुरू आहे- तुषार शेळके, जनसंपर्क अधिकारी, साई संस्थान
आम्हाला थ्रीडी स्कॅनिंगची गरज नाही : "साई समाधी मंदिरातील मूर्ती आमचे आजोबा बालाजी तालीम यांनी सत्तर वर्षांपूर्वी घडवली. हजारो वर्षे या मूर्तीला काहीही होणार नाही. मूर्तीसाठी वापरलेल्या इटालियन मार्बलचे हे वैशिष्ट्य आहे. आमच्याकडं या साई मूर्तीची मूळ प्रतिकृती आहे. त्याआधारे आम्ही हुबेहूब नवी मूर्ती घडवू शकतो. साई संस्थानने थ्रीडी स्कॅनिंग करण्याचं योग्य पाऊल उचललंय. मात्र, आम्हाला या थ्रीडी स्कॅनिंगची गरज नाही", अशी प्रतिक्रिया मूर्तिकार राजीव तालीम यांनी दिली.
हेही वाचा -