ठाणे : सावकाराच्या जाचाला कंटाळून एका व्यावसायिकानं आत्महत्या केल्याची घटना घडली. जीवन संपवण्यापूर्वी व्यावसायिकानं व्हिडिओ करत आपण आत्महत्या करत असल्याचं सांगितलं. ही घटना भिवंडी तालुक्यातील महापोली गावात घडली असून, याप्रकरणी गणेशपुरी पोलीस ठाण्यात तीन सावकारांवर विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी बहुउद्दिन ऊर्फ मुन्ना यासीन अन्सारी या सावकाराला अटक केली आहे. तर, अमान नसीम भावे आणि रेहमान कादीर कोतकर हे दोघे आरोपी फरार झाले आहेत. गणेशपुरी पोलीस पथक त्यांचा शोध घेत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान सोनवणे यांनी दिली.
व्यवसायासाठी घेतले होते पैसे : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत कामिल शेख हे भिवंडी तालुक्यातील महापोली गावात कुटूंबासह राहत होते. त्यांची साबण तयार करणारी फॅक्टरी होती. व्यावसायासाठी त्यांनी महापोली गावातील अमान नसीम भावे, बहुउद्दिन उर्फ मुन्ना यासीन अन्सारी आणि रेहमान कादीर कोतकर यांच्याकडून व्याजानं सुमारे चार ते पाच लाख रुपये घेतले होते. विशेष म्हणजे मृत कामिल शेख यांनी आतापर्यंत ३ लाख ७० हजार रुपये परत केल्याचं तक्रारीत नमूद केलं आहे. आरोपींकडून शेख यांना मारहाण, दमदाटी आणि शिवीगाळ करुन वेळोवेळी त्रास दिला जात असल्याचा आरोप मृताच्या पत्नीने केला.
पैसे वसूल करण्यासाठी लावला होता तगादा : गुन्हा दाखल असलेल्या तीन आरोपींनी व्याजाचे पैसे वसूल करण्यासाठी मृत शेख यांच्याकडं तगादा लावला होता, असा आरोप मृताच्या पत्नीने केला. आत्महत्या करण्यापूर्वी कामिल शेख यांनी व्हिडिओ करून माझ्या आत्महत्येस गावातील अमान, बहुउद्दिन ऊर्फ मुन्ना यासीन अन्सारी आणि रहमान हे जबाबदार असल्याचं सांगितलं होतं.
ज्यादा व्याजासाठी तगादा : मृत कामिल यांच्या पत्नीनं सांगितलं की, "अमानकडून ५० हजार घेतले होते. कामिल यांनी त्याचे व्याजासह अडीच लाख दिले होते. तरी अधिकच्या १५ हजार रूपयांसाठी तो रोज कामिल यांच्याकडून १५०० रूपये घेत होता. त्यासह त्यानं अधिकच्या पैशांसाठी कामिल यांना मारहाण केली होती. रेहमान कोतकर याच्याकडून एक लाख रूपयांचं कर्ज घेतलं होतं. त्याबदल्यात त्याला व्याजासहित तीन लाख तीस हजार दिले होते. उरलेल्या पंचवीस हजार रूपयांसाठी त्याने कामिल यांच्याकडं तगादा लावला होता."
आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल : वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान सोनवणे यांनी सांगितलं की, "कामिल शेख यांचा भाऊ आसिफच्या तक्रारीवरून ३० जानेवारीला गणेशपुरी पोलीस ठाण्यात आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात बहुउद्दिन ऊर्फ मुन्ना यासीन अन्सारी याला अटक करून न्यायालयात हजर केलं. यावेळी न्यायालयाने त्याला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यातील दोन फरार आरोपींचा शोध गणेशपुरी पोलीस घेत आहेत."
हेही वाचा :