मुंबई :UBT खासदार अरविंद सावंत यांच्याविरोधात नागपाडा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. शिवसेना उमेदवार शायना एन सी यांच्या विरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्या प्रकरणी ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. नागपाडा पोलिसात स्वतः शायना एन सी यानी ही तक्रार दाखल केली आहे.
शिवसेना (UBT) नेते आणि खासदार अरविंद सावंत यांच्या "इम्पोर्टेड माल" टिप्पणीबद्दल तक्रार नोंदवण्यासाठी शिवसेना नेत्या शायना एन सी नागपाडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्या होत्या. शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी नागपाडा पोलीस ठाण्याबाहेर घोषणाबाजी केली आणि शिवसेना नेत्या शायना एन सी यांच्याबद्दल "इम्पोर्टेड माल" अशा टिप्पणीबद्दल शिवसेना (यूबीटी) नेते आणि खासदार अरविंद सावंत यांनी माफी मागावी अशी मागणी केली.
शायना एन सी तक्रार दाखल करण्यासाठी आल्या असतानाचा व्हिडिओ (ईटीव्ही भारत बातमीदार) शायना एन सी तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये -शिवसेना (UBT) नेते आणि खासदार अरविंद सावंत यांच्या "इम्पोर्टेड माल" टिप्पणीबद्दल तक्रार नोंदवण्यासाठी शिवसेना नेत्या शायना एनसी नागपाडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्या. यावेळी त्यांच्यासोबत अनेक महिला कार्यकर्त्या तसंच इतरही कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. या कार्यकर्त्यांनी यावेळी मोठी घोषणाबाजी केली.
गुन्हा दाखल -शिवसेना उबाठाचे खासदार अरविंद सावंत यांनी शिवसेना मुंबादेवी मतदार संघातील उमेदवार शायना एन. सी. यांच्या विरोधात केलेल्या अवमानजनक वक्तव्यावर नागपाडा पोलीस स्टेशनमध्ये आज भारतीय न्याय संहितेच्या कलन ७९ आणि कलम ३५६/२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. अरविंद सावंत यांच्या अवमानजनक वक्तव्याची शिवसेनेनं गंभीर दखल घेत पोलिसात तक्रार केली. त्यानंतर अरविंद सावंत यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
तर महिला शांत बसणार नाही -यावेळी शायना एन सी म्हणाल्या, "आज लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे. मला राजकारणात २० वर्ष झाली. मी महिला आहे, माल नाही. कोणत्याही महिलेविरोधात अपशब्द वापराल तर महिला शांत बसणार नाही, असा इशारा शायना एन सी यांनी दिला. मुंबादेवीच्या आशीर्वादाने मी मुंबईकरांची सेवा करत आहेत. अरविंद सावंत आणि उबाठा शिवसेनेची महिलाविरोधी मानसिकता यातून दिसून आली." तसंच, "एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यात महिला सक्षमीकरणासाठी लाडकी बहीण योजना राबवत आहेत. महिलांचा मान सन्मान करणे ही आपली संस्कृती आहे, मात्र अरविंद सावंत यांनी अश्लाघ्य शब्दात महिलांचा अपमान केला. ही त्यांची संस्कृती आहे का, सावंत यांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे, संजय राऊत, शरद पवार, नाना पटोले गप्प का," असा सवाल शायना एन सी यांनी केला.
खासदारकी रद्द करावी -सावंत यांच्या अवमानजनक वक्तव्यामुळे राज्यातील नारीशक्ती येत्या निवडणुकीत शिवसेना उबाठाला धडा शिकवेल, असं शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी सांगितलं. यावेळी सावंत यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी आणि त्यांची खासदारकी रद्द करावी, अशी मागणी करणारं निवदेन महिला आघाडीकडून पोलिसांना देण्यात आलं. सावंत यांच्या वक्तव्यावर शिवसेना उबाठा आणि आदित्य ठाकरे काय कारवाई करणार असा सवाल शीतल म्हात्रे यांनी केला.
'महाविनाश' आघाडी -महिला सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेमुळं राज्यातील अडीच कोटी महिलांना लाभ झाला. मात्र 'महाविनाश' आघाडीच्या नेत्यांना महिला म्हणजे ‘माल’ वाटत आहे. सावंत यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करताना काँग्रेसचे उमेदवार अमीन पटेल बाजूला उभे राहून हसत होते यापेक्षा दुर्देवी आणि शरमेची बाब काय असू शकते, अशी टीका शायना एन सी यांनी केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक्सवर पुढील प्रतिक्रिया दिलीय, "उबाठाच्या एका खासदारांनी शिवसेनेच्या उमेदवार शायना एन सी यांच्या संदर्भात केलेले विधान हे समस्त स्त्री जातीचा अपमान करणारे आणि उबाठाची वैचारिक पातळी दाखवणारे आहे. एका स्त्रीचा उल्लेख ‘माल’ असा करुन अरविंद सावंत यांनी महाराष्ट्रातील महिलांच्या पराक्रमी परंपरेला आणि पुरोगामी विचारसरणीला शरमेने मान खाली घालायला लावली आहे. राजधर्म शिकवणाऱ्या माता जिजाईपासून तर समाजसुधारणेचा वसा घेतलेल्या सावित्रीबाई फुले यांच्यापर्यंतची थोर परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. स्त्रीत्वाचा सन्मान आणि महिलांना सक्षम करण्याच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देणे हा मराठी माणसाचा डीएनए आहे. आमच्यासाठी प्रत्येक महिला ही लाडकी बहिण असून तिची उन्नती, तिचा विकास, तिची प्रतिष्ठा आणि तिचा स्वाभिमान हाच आमचा ध्यास आहे. राजकारणापायी एखाद्या व्यक्तीने एवढी खालची पातळी गाठावी हे दुर्दैवी आहे."
नेमकं प्रकरण काय? - शिवसेना यूबीटी नेते खासदार अरविंद सावंत यांना उमेदवारांच्यावरून एक प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी मुळचे आणि बाहेरून आलेले यासंदर्भात वक्तव्य केलं. त्यामध्ये त्यांनी शायना एन सी यांच्या बाबतीत इंपोर्डेट माल असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर हे प्रकरण शिवसेनेच्या नेत्या आणि कार्यकर्त्यांनी उचलून धरलं. यामध्ये शायना एन सी यांना इंपोर्टेड माल असं संबोधल्यामुळं हे प्रकरण चिघळलं. त्याला विरोध होऊ लागला. यातूनच शिवसेना कार्यकर्ते चिडले आणि शायना यांनीही या वक्तव्याची दखल घेतली. त्यातून त्यांनी नागपाडा पोलीस स्टेसनमध्ये जाऊन तक्रार नोंदवली आहे.
नीलम गोऱ्हे यांचे निवडणूक आयोगाला पत्र -या प्रकरणी आणि विधान परिषदेच्या उपाध्यक्षा नीलम गोऱ्हे यांनी उडी घेतली असून त्यांनी थेट निवडणूक आयोगाला कारवाईची मागणी करणारं पत्र लिहिलं आहे. त्या पत्रात लिहितात..
मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार शायना एन. सी . यांचेबाबत बोलताना उबाठा खासदार अरविंद सावंत यांनी मुंबादेवीत आयात माल चालणार नाही असे विधान केले आहे. मराठीत माल हा शब्द अनेक वेळा महिलांचा अपमान करण्यास वापरला जातो. महिलांसाठी लोकसभेत मा. पंतप्रधान ना. नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली महिलांना लोकसभेत व विधानसभेत आरक्षण देणारे नमो महिला शक्ती वंदन विधेयक मंजूर केले आहे. अशा वेळी निवडणुकीत विचाराने प्रचार करण्याऐवजी उबाठा खासदार स्वतः महिलांबाबत असे अप्रतिष्ठा करणारी विधाने करत आहेत. याबाबतीत आपण चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, तसेच पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश आपण द्यावेत ही विनंती आहे.