मुंबई : अभिनेता सैफ अली खान चाकू हल्ला प्रकरणात सध्या गुन्हे शाखेकडून भजन सिंग या रिक्षा चालकाची चौकशी सुरू आहे. भजन सिंग यांनी सैफ अली खानला जखमी अवस्थेत असताना लिलावती रुग्णालयात दाखल केलं होतं. शुक्रवारी (17 जाने.) भजन सिंग हे रिक्षा चालक माध्यमांसमोर आले. त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सैफ अली खान चाकू हल्ला प्रकरणात आतापर्यंत 40 ते 50 जणांचे जबाब नोंदवले आहेत. अद्यापही या हल्ल्यामागचं खरे कारण आणि मुख्य आरोपी पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
35 हून अधिक टीम तयार : याबाबत अधिक माहिती अशी की, सैफ अली खान चाकू हल्ला प्रकरणाच्या तपासासाठी मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या 35 हून अधिक टीम तयार करण्यात आल्या आहेत. या सर्व टीम मुंबईसह इतर शहरांमध्ये संशयित गुन्हेगाराचा शोध घेत आहेत. या संदर्भात शुक्रवारी एका संशयित आरोपीला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. मात्र, चौकशी दरम्यान नेमकं काय घडलं? त्या संशयित आरोपीनं कोणती माहिती दिली? हे अद्याप समोर आलेलं नाही.
सीसीटीव्ही फुटेजची तपासणी : सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याच्या काही तासानंतर पोलिसांनी हल्लेखोराचे 6 सेकंदाचे सीसीटीव्ही फुटेज जारी केले होते. या फुटेजमध्ये आरोपी हल्लेखोर सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर त्याच्या घरातून खाली उतरताना दिसत आहे. या फुटेजमध्ये त्याचा चेहरा स्पष्ट दिसतोय. मात्र, अद्यापही मुंबई पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचू शकलेले नाहीत. सध्या गुन्हे शाखा आणि मुंबई पोलीस या सीसीटीव्हीच्या आधारे संशयित आरोपीचा शोध घेत आहेत. संशयित आरोपीप्रमाणे दिसणारा एक व्यक्ती वांद्रे येथील एका इमारतीत चप्पल चोरी करताना आढळलाय. तोच व्यक्ती दादर पश्चिमेला असलेल्या एका मोबाईल दुकानातदेखील दिसून आला. त्यामुळं पोलिसांचं पथक सध्या दादर भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.
चार सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती : आतापर्यंत संशयित हल्लेखोराचे चार सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहेत. यातील एक सैफच्या घरातून बाहेर पडताना, दुसरा चप्पल चोरताना, तिसरा वांद्रे परिसरात फिरताना आणि चौथा दादर येथे त्याचा मोबाईल शॉपीमध्ये खरेदी करताना हा संशयित आरोपी दिसत आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत सैफ अली खानच्या घरी काम करणारे सर्व कर्मचारी, फ्लोअर पॉलिशचे काम करणारे मजूर, फर्निचरचे काम करणारे मजूर यांची चौकशी केली आहे. शुक्रवारी रात्री सैफची पत्नी आणि अभिनेत्री करीना कपूरचीदेखील चौकशी करण्यात आली. तिचा जबाब पोलिसांनी नोंदवून घेतलाय. हल्लेखोराच्या चेहऱ्याशी साधर्म्य असलेल्या एका व्यक्तीलाही शुक्रवारी ताब्यात घेण्यात आलं होतं. पण, तो व्यसनी असल्याचं चौकशीत समोर आलंय.
वांद्रे पोलीस स्थानकाबाहेर आंदोलन : अभिनेता सैफ अली खान चाकू हल्ला प्रकरणी एका दलित संघटनेनं वांद्रे पोलीस स्थानकाबाहेर आंदोलन केलं. या आंदोलनात केवळ तीनच व्यक्ती सामील झाल्या होत्या. या तिघांनाही पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलंय. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बोलावलं असल्याचं सांगत पोलीस या तिघांना घेऊन गेले.
- अभिनेता सैफ अली खान चाकू हल्ला प्रकरणी घटनेच्या दिवशी ठसे तज्ञांनी ठसे घेतले होते. ते जुळविण्याचं काम सध्या पोलीस करत आहेत. आतापर्यंत पोलिसांनी 40 ते 50 जणांचे जबाब नोंदवले आहेत. यातील कोणाचेही ठसे जुळले नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. शुक्रवारी पोलिसांनी एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले होते. मात्र, त्याचेदेखील ठसे जुळले नसल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.
हेही वाचा -
- सैफ आली खान हल्ला प्रकरण: गृह राज्यमंत्री योगेश कदमांची Exclusive माहिती, म्हणाले बाबा सिद्दिकी अन् सैफ अली खान . . .
- रक्तानं लाल पांढऱ्या शर्टवाल्याला रुग्णालयात सोडलं, नंतर कळलं तो सैफ अली खान होता, ऑटो रिक्षावाल्यानं सांगितला अनुभव
- सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी करीना कपूरचा एक्स बॉयफ्रेंड शाहिद कपूरनं दिली प्रतिक्रिया...