पुणे- अभिनेता सैफ अली खान याच्या घरात घुसून हल्ला करण्यात आल्याची घटना घडलीय, तर दुसरीकडे अभिनेता शाहरुख खान याच्या मन्नत बंगल्याचीदेखील संशयितांनी रेकी केल्याबद्दल पोलिसांकडून संशय व्यक्त केला जातोय. या प्रकरणात राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर विरोधकांकडून टीका केली जातेय. याबाबत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना विचारलं असता ते म्हणाले की, जी काही घटना घडली आहे, ती वस्तुस्थिती आहे. या प्रकरणात पोलिसांकडून विविध पथकं तैनात करण्यात आली असून, आरोपीचा शोध सुरू आहे. एखाद्या घटनेवरून लगेच कायदा आणि सुव्यवस्था तसेच राजकीय भाष्य करणे उचित नाही. मुंबई हे एक महत्त्वाचं शहर असून, प्रत्येकाने बोलताना जबाबदारीने बोलावं, असं यावेळी भुसे म्हणालेत.
गरीब मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं पाहिजे : शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे हे काल पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी महापालिकेच्या शाळेला भेट दिली आणि यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ येथे दादा भुसे यांच्या अध्यक्षेखाली बैठक पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मंत्री दादा भुसे म्हणाले की, आज जेव्हा पिंपरी-चिंचवड येथील शाळेला भेट दिली, तेव्हा विद्यार्थी आणि शिक्षकांचीही कामगिरी चांगली असल्याचं पाहायला मिळालं. येणाऱ्या काळात गरिबातील गरीब पालकांच्या मुलांनादेखील दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं पाहिजे हा मानस शिक्षण विभागाचा असणार आहे. तसेच इतर माध्यमांच्या ज्या काही शाळा आहेत, त्या शाळांच्या फीलादेखील एक मर्यादा असली पाहिजे, यावरदेखील विभागाच्या माध्यमातून काम करण्यात येणार आहे.
सीबीएससी पॅटर्न मराठीत घेण्यासाठीसुद्धा नियोजन प्रगतिपथावर : तसेच येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षादेखील कशा पद्धतीने कॉपीमुक्त होतील यावर देखील विभाग काम करीत आहे. तसेच सीबीएससी पॅटर्न मराठीत घेण्यासाठीसुद्धा नियोजन प्रगतिपथावर आहे. येत्या नवीन शैक्षणिक वर्षात ते आपण स्वीकारत आहोत. इयत्ता पहिलीपासून ते स्वीकारतोय. 2024-25 वर्ष हे तयारीच असणार आहे आणि 2025-26 मध्ये दोन टप्प्यात ते आपण स्वीकारणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.
बाळासाहेब ठाकरेंचे आम्ही शिवसैनिक आहोत : आगामी महापालिका निवडणुकांबाबत दादा भुसे यांना विचारलं असता ते म्हणाले की, बाळासाहेब ठाकरेंचे आम्ही शिवसैनिक आहोत. निवडणुकीसाठी आमचे शिवसैनिक कधीही तयार असतात. युतीच्या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री हे एकत्र बसून निर्णय घेतील, असंही यावेळी दादा भुसे म्हणालेत. बोगस शाळांबाबत मंत्री दादा भुसे यांना विचारलं असता ते म्हणाले की, ज्या बोगस शाळा असतील त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. तसेच जे चुकीचे आहेत, त्यांच्यावर नक्कीच कारवाई केली जाईल, असंदेखील यावेळी भुसे म्हणाले.
हेही वाचा :