बीड- सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे वातावरण आधीच तापलेलं असताना गेल्या काही दिवसांपूर्वीच आणखी एका सरपंचाचा अपघातात मृत्यू झालाय. परळी धर्मापुरी मार्गावरील मिरवट फाट्यावर राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परनं दुचाकीला धडक दिल्यानं सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा मृत्यू झालाय. ते सौंदाना गावचे सरपंच होते. त्यानंतर परळीतील राखेचं प्रकरणही चर्चेत आलं होतं. आता राखेतील अर्थकारणामुळे चर्चेत आलेल्या परळीतील थर्मल पॉवर स्टेशनमधील कर्मचाऱ्यांच्या बदलीचे सत्र सुरू झालंय.
आणखी 50 कर्मचाऱ्यांची बदली प्रस्तावित : आतापर्यंत परळीतील थर्मल पॉवर स्टेशनमधील 82 जणांची बदली करण्यात आलीय. तसेच 12 जणांनी बदलीसाठी स्वतःहून अर्ज केले आहेत. विशेष म्हणजे आणखी 50 कर्मचाऱ्यांची बदली प्रस्तावित आहे. त्यामुळे बीडमधील कायदा आणि सुव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारनं जोरदार तयारी सुरू केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
आतापर्यंत तब्बल 94 कर्मचाऱ्यांची बदली : राज्यातील प्रमुख औष्णिक विद्युत केंद्रांपैकी एक असलेल्या परळीच्या औष्णिक विद्युत केंद्रातील 10 ते 20 नव्हे तर आतापर्यंत तब्बल 94 कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आलीय. भुसावळ येथे उभारण्यात येत असलेल्या 250 मेगावॅटच्या प्रकल्पासाठी हे कर्मचारी हलवले गेल्याची माहिती आहे. परळीत सध्या 250 मेगावॉटचे 3 युनिट आहेत, यासाठी तब्बल 900 कर्मचारी या ठिकाणी काम करतात. मात्र 750 मेगावॅटचे संच परळीत असतानादेखील अतिरिक्त कर्मचारी असल्याच्या नावाखाली परळीतून 94 कर्मचाऱ्यांच्या बदल्या या भुसावळ येथे करण्यात आल्यात. तर आणखी 50 जणांची बदली प्रस्तावित आहे. गेल्या काही दिवसांत राखेतील अर्थकारणामुळे परळीचे थर्मल पॉवर स्टेशन चर्चेत आलेत. या दरम्यानच आता या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.
हेही वाचा..