बीड : संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात आज सहा आरोपींची पोलीस कोठडी संपल्यानं त्यांना न्यायालयात ऑनलाईन हजर करण्यात आलं. यावेळी न्यायालयानं त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, प्रतीक घुले, जयराम चाटे, सिद्धार्थ सोनवणे यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली. बीड जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायमूर्ती सुरेखा पाटील यांनी ही निर्णय दिला. तर वाल्मिक कराड याच्या वकिलाची प्रकृती बरी नसल्यानं त्यांनी तारीख वाढवून देण्याची मागणी केली. त्यामुळे वाल्मिक कराड प्रकरणाची सुनावणी 20 जानेवारीला होणार आहे.
वाल्मिक कराड प्रकरणी सुनावणीची तारीख ढकलली पुढं : वाल्मिक कराड याच्या खंडणी प्रकरणातील सुनावणी 20 जानेवारी रोजी होणार. दोन कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणी आज केज न्यायालयात वाल्मिक कराड याच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार होती. मात्र वाल्मिक कराडच्या वकिलाची प्रकृती बरी नसल्यानं त्यांनी पुढील तारीख वाढवून मागितली. त्यामुळे या प्रकरणावर आता पुढील सुनावणी 20 जानेवारीला होणार आहे. दुसरीकडं विष्णू चाटे याच्या जामीन अर्जावरही 22 तारखेलाच सुनावणी घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
हत्याकांडातील सहा आरोपींची ऑनलाइन सुनावणी : संतोष देशमुख खून प्रकरणातील सहा आरोपींना आज बीड जिल्हा सत्र न्यायालयात हजर करणार होते. मात्र यामध्ये त्यांना या ठिकाणी न आणता गेवराई इथं असलेल्या कोठडीमधूनच त्यांची ऑनलाइन सुनावणी घेण्यात आली आहे. बीड शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ऑनलाइन सुनावणी घेण्यात आली. यावेळी या सुनावणीत न्यायालयानं सहा आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे.
हेही वाचा :