वेलिंग्टन NZ vs ENG 2nd Test : इंग्लंड क्रिकेट संघ आणि न्यूझीलंड क्रिकेट संघ यांच्यात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. इंग्लंडनं पहिला सामना जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसरा सामना 6 डिसेंबरपासून खेळवला जात आहे. या सामन्यात 26 वर्षीय इंग्लंडच्या फलंदाजानं इतिहास रचला. कसोटी क्रिकेटमध्ये ही कामगिरी करणारा तो दुसरा खेळाडू ठरला.
जॅक क्रॉलीनं रचला इतिहास : दुसऱ्या कसोटी सामन्यात सलामीच्या फलंदाजाची भूमिका बजावणाऱ्या जॅक क्रॉलीनं न्यूझीलंडविरुद्ध मोठी कामगिरी केली. कसोटी सामन्याच्या पहिल्याच षटकात षटकार मारणारा तो जगातील दुसराच खेळाडू ठरला. पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर त्यानं टीम साऊथीला षटकार ठोकला. या फटकेबाजीनं तो जगातील दुसरा तर इंग्लंडचा पहिला खेळाडू ठरला. 1959 साली इंग्लंडच्या आर्थर मिल्टननं दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर षटकार मारला होता, जो कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लिश खेळाडूनं मारलेला पहिला षटकार होता.
क्रॉली स्वतात आउट : मात्र, क्रॉलीला त्याची खेळी संस्मरणीय बनवता आली नाही. तो मोठा डाव खेळण्यात अपयशी ठरला. त्याला अवघ्या 17 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतावं लागलं. मॅट हेन्रीनं त्याला बाद केलं. क्रॉली बाद झाल्यानंतर हॅरी ब्रूकनं पदभार स्वीकारला. त्यानं शानदार शतकी खेळी खेळली. या युवा फलंदाजानं 115 चेंडूत 123 धावांची खेळी केली. याआधीही ब्रुकनं न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात शतक झळकावलं होतं.
इंग्लंडची 280 धावांपर्यंतच मजल : या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. इंग्लंडचा संघ 54.4 षटकात 280/10 धावांवर बाद झाला. हॅरी ब्रूकशिवाय ऑली पॉपनंही इंग्लंडकडून 78 चेंडूत 66 धावांची खेळी केली. याशिवाय ख्रिस वोक्सनं 43 चेंडूत 18 धावा केल्या. न्यूझीलंडसाठी नॅथन स्मिथ हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्यानं केवळ 11.4 षटकात 86 धावा दिल्या आणि 4 बळी घेतले. त्याच्याशिवाय मॅट हेन्रीनंही 2 विकेट्स घेतल्या, तर विल ओ'रुर्कनं 3 विकेट्स घेतल्या.
हेही वाचा :
- Day-Night Test: 'पिंक बॉल' कसोटीत भारताची अ'यशस्वी' सुरुवात; 'अशी' कामगिरी करणारा जैस्वाल सातवा खेळाडू
- फ्लॉवर नाही फायर... हॅरी ब्रूकच्या विक्रमी शतकानं वाचवली 'साहेबां'ची प्रतिष्ठा