नवी दिल्ली Zaheer Khan : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 सुरु होण्यापूर्वी, संजीव गोएंका यांच्या मालकीच्या लखनऊ सुपर जायंट्स संघानं माजी भारतीय वेगवान गोलंदाज झहीर खानला संघाचा मार्गदर्शक म्हणून नियुक्त केलं आहे. एलएसजीमधून गौतम गंभीर बाहेर पडल्यानंतर रिक्त झालेल्या पदावर आता झहीर खान दिसणार आहे. आज लखनऊ टीमनं आपल्या अधिकृत सोशल मीडियावर पोस्ट करुन याबद्दल माहिती दिली आहे. एलएसजीनं त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट पोस्ट केली आहे. ज्यात त्यांनी एक व्हिडिओ अपलोड केला आहे. या व्हिडिओमध्ये झहीर खान दिसत आहे. या पोस्टमध्ये 'झहीर, तू खूप दिवसांपासून लखनऊच्या हृदयात आहेस,' असं लिहिलं आहे.
झहीर खान लखनऊ सुपर जायंट्सचा मेंटर : आता हा वेगवान गोलंदाज आयपीएल 2025 मध्ये लखनऊ संघाचा मार्गदर्शक म्हणून दिसणार आहे. याआधी गौतम गंभीर लखनऊ संघात मार्गदर्शकाची जबाबदारी पार पाडत होता. तो गेल्यानंतर हे पद रिक्त होते. आता संजीव गोएंका यांच्या लखनऊ सुपर जायंट्सनं झहीर खानची नियुक्ती करुन हे पद भरलं आहे. झहीरला संघाचा मार्गदर्शक बनवताना संघाचे मालक संजीव गोएंका यांनी त्याला संघाची जर्सी भेट दिली.
गंभीरनंतर रिक्त होतं पद :लखनऊ सुपर जायंट्सचा संघ आयपीएल 2022 मध्ये प्रथमच खेळताना दिसला होता. या संघाच्या सुरुवातीपासून, माजी भारतीय क्रिकेटपटू आणि सध्या भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक, गौतम गंभीर संघात मार्गदर्शकाची भूमिका बजावत होता. पण त्यानं आयपीएल 2024 मध्ये एलएसजी सोडलं आणि त्याच्या जुना संघ कोलकाता नाइट रायडर्समध्ये मार्गदर्शक म्हणून प्रवेश केला. यानंतर लखनऊ संघात मेंटरचं पद रिक्त होतं.
झहीर खानची कामगिरी कशी : डावखुरा वेगवान गोलंदाज झहीर खाननं भारतासाठी 92 कसोटी सामन्यात 311 विकेट्स, 200 एकदिवसीय सामन्यात 283 विकेट्स आणि 17 टी 20 सामन्यात 17 बळी घेतले आहेत. याशिवाय त्यानं आयपीएलच्या 100 सामन्यांमध्ये 107 विकेट्स घेतल्या आहेत. तो भारताच्या एकदिवसीय विश्वचषक 2011 विजेत्या संघाचा देखील एक भाग होता. झहीर खान मुंबई इंडियन्स संघाचा क्रिकेट संचालकही होता. आता तो नव्या भूमिकेसाठी पूर्णपणे तयार आहे.
हेही वाचा :
- काय सांगता...! पाकिस्तान क्रिकेटमध्ये AI च्या माध्यमातून खेळाडूंची निवड? पीसीबी अध्यक्षांचं अजब वक्तव्य - Artificial intelligence in Cricket
- आश्चर्यच...! एकाच सामन्यात दोन्ही संघाकडून खेळत केला अनोखा विक्रम, हे झालं तरी कसं? - MLB star Danny Jansen