महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

न्यूझीलंडकडून दारुण पराभवानंतर भारतीय संघाचं WTC गुणतालिकेत मोठं नुकसान

पुणे कसोटीत पराभवानंतर भारतीय संघानं कसोटी मालिका गमावली आहे. यासह भारतीय संघाचं जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठं नुकसान झालं आहे.

WTC Point Table Update
रोहित शर्मा आणि ऋषभ पंत (AP Photo)

By ETV Bharat Sports Team

Published : Oct 26, 2024, 5:12 PM IST

पुणे WTC Point Table Update : कसोटीत भारतीय क्रिकेट संघाला न्यूझीलंडकडून दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं. न्यूझीलंडनं भारताचा 113 धावांनी पराभव केला. अशा प्रकारे भारतीय संघानं 3 सामन्यांची मालिका गमावली आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडनं कसोटी मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. बेंगळुरु इथं खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडनं भारताचा 8 गडी राखून पराभव केला होता आणि आता दुसऱ्या कसोटीत त्यांनी 113 धावांनी धूळ चारुन नवा इतिहास रचला होता. खरं तर भारतीय संघाला 12 वर्षांनंतर मायदेशात कसोटी मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला आहे. याआधी भारतीय संघाला 2012 साली इंग्लंडकडून कसोटी मालिका गमवावी लागली होती.

भारताचा दारुण पराभव : पुणे कसोटीत प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडनं पहिल्या डावात 259 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ पहिल्या डावात केवळ 156 धावांत गडगडला. यानंतर न्यूझीलंडनं दुसऱ्या डावात 255 धावा केल्या आणि यजमान भारताला विजयासाठी 359 धावांचं लक्ष्य दिलं. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ दुसऱ्या डावात केवळ 235 धावाच करु शकला.

भारताचं भयंकर नुकसान : कसोटी मालिका गमावण्याबरोबरच जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अर्थात WTC च्या गुणतालिकेत भारतीय संघाचं मोठं नुकसान झालं आहे. दुसरीकडं, न्यूझीलंडनं गुणतालिकेत झेप घेतली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट्स टेबलवर नजर टाकली तर भारतीय संघ पुणे टेस्टपूर्वीही पहिल्या क्रमांकावर होता आणि आजही पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र आता भारत आणि ऑस्ट्रेलियामधील पीसीटी अंतर खूपच कमी झालं आहे. पुणे कसोटीपूर्वी भारतीय संघाचा पीसीटी 68.06 होता, जो या सामन्यातील पराभवानं आता 62.82 वर आला आहे. तर ऑस्ट्रेलियाचे पीसीटी फक्त 62.50 आहे, कारण ऑस्ट्रेलियानं मार्च 2024 पासून एकही कसोटी सामना खेळलेला नाही.

भारत आणि ऑस्ट्रेलियानं टॉप 2 वर कायम : दरम्यान, इतर संघांबद्दल बोलायचं झाल्यास, भारत आणि ऑस्ट्रेलियानंतर श्रीलंका संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. श्रीलंकेचा पीसीटी सध्या 55.56 आहे. मालिका जिंकल्यानंतर, न्यूझीलंडनं दक्षिण आफ्रिकेला मागं टाकलं आणि 50.00 पीसीटीसह चौथ्या स्थानावर कब्जा केला. दक्षिण आफ्रिकेचा संघ एक स्थान गमावून आता पाचव्या स्थानावर घसरला आहे. दुसरीकडे, पाकिस्तान संघ दीर्घ कालावधीनंतर मायदेशात कसोटी मालिका जिंकण्यात यशस्वी ठरला, ज्यामुळं त्यांना जागतिक कसोटी चॅम्पियनशिप गुणतालिकेत मोठा फायदा झाला. पाकिस्तानचा संघ आता 7व्या क्रमांकावर पोहोचला आहे. पाकिस्तानचा पीसीटी 33.33 आहे. त्याच वेळी, इंग्लंड संघ 40.79 च्या पीसीटीसह सहाव्या स्थानावर घसरला आहे. पाकिस्ताननं मालिका जिंकल्यानंतर बांगलादेशचा संघही एका स्थानानं घसरुन 8व्या स्थानावर आला आहे, तर वेस्ट इंडिजचा संघ सर्वात खालच्या स्थानावर म्हणजेच 9व्या स्थानावर गेला आहे.

हेही वाचा :

  1. 4331 दिवसांनी भारतीय संघानं पाहिला सर्वात लाजिरवाणा दिवस... 69 वर्षांनी न्यूझीलंडनं रचला इतिहास

ABOUT THE AUTHOR

...view details