मुंबई : रणवीर अलाहाबादिया प्रकरणी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडं करण्यात आलेल्या तक्रारींची दखल आयोगानं घेतली आहे. या प्रकरणी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना अहवाल सादर करण्याचे निर्देश महिला आयोगाने दिले आहेत. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी याबाबत निर्देश दिले आहेत.
तरुण पिढीच्या मानसिकतेवर परिणाम : कुठलेही शासकीय नियमन नसलेल्या डिजिटल माध्यमातील या शोमधून वारंवार आक्षेपार्ह, अश्लील वक्तव्ये केली जातात. याचा तरुण पिढीच्या मानसिकतेवर गंभीर, दूरगामी परिणाम होतो. भान नसलेले, टीआरपीसाठी वाट्टेल ते करणारे शो तातडीनं बंद झाले पाहिजेत, अशी भूमिका आयोगानं मांडली. त्यामुळं याचं प्रसारण बंद करावं. तसेच भारतीय न्याय संहिता, स्त्रियांचे अश्लील प्रदर्शन प्रतिबंध कायदा, माहिती प्रसारण कायदा आणि अनुषंगिक कायद्यान्वये तातडीनं आवश्यक ती कारवाई करत आयोगास अहवाल सादर करण्याचे निर्देश पोलीस आयुक्त, मुंबई यांना देण्यात आल्याची माहिती, चाकणकरांनी दिली.
राज्य महिला आयोगाने घेतली दखल : यू ट्यूबवर प्रसारित होणाऱ्या 'इंडियाज गॉट लेटेंट शो'मध्ये रणवीर अलाहाबादिया, समय रैना, अपूर्वा यांनी महिलांविषयी अत्यंत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी लेखी तक्रार ॲड. आशिष रॉय, ॲड. पंकज मिश्रा यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडं केली होती. त्याची तातडीने आणि गांभीर्याने राज्य महिला आयोगाने दखल घेतली. तर पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधितांना दिले आहेत.
यांनी घेतली प्रकरणाची दखल : राष्ट्रीय महिला आयोगाने देखील या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आहे. या प्रकरणी चौकशीसाठी या शोमधील संबंधितांना राष्ट्रीय महिला आयोगानं त्यांच्या नवी दिल्लीतील कार्यालयात 17 फेब्रुवारी रोजी बोलावलं आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी या प्रकरणी दखल घेतली. आसामचे मुख्यमंत्री हिंमत विश्व शर्मा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या प्रकरणी प्रतिक्रिया दिल्या होत्या. शिवसेना उबाठाच्या राज्यसभेतील खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी देखील हा विषय संसदेत मांडण्याचं स्पष्ट केलं.
हेही वाचा -