जम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये संपूर्ण दारूबंदी लागू करण्याची मागणी करत शिवसेनेनं (उबाठा) जम्मूत जोरदार निदर्शनं केली. यावेळी ३ मार्चपासून सुरू होणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनात जम्मू-काश्मीरमध्ये संपूर्ण दारूबंदी लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मनीष साहनी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.
विविध फलकांनी वेधले नागरिकांचे लक्ष : शिवसेना (उबाठा) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मनीष साहनी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी "जम्मू आणि काश्मीरच्या पवित्र भूमीवर दारू विक्रीवर बंदी घालावी, व्यसनाकडं पहिलं पाऊल म्हणजे दारूची दुकानं, मंदिरांचे शहर दारुच्या शहरात बदललं" असे संदेश लिहिलेले फलक घेऊन शिवसेना कार्यकर्त्यांनी (उबाठा) मोर्चा काढला.
काश्मीर देवांची भूमी : "जम्मू आणि काश्मीर ही ऋषी आणि पैगंबरांची भूमी आहे. इथं श्री माता वैष्णो देवीचा दरबार, श्री अमरनाथ धाम, हजरतबल दर्गा, गुरुद्वारा कलगीधर साहिब आणि तपो अस्थान अशी जगप्रसिद्ध पवित्र धार्मिक स्थळं आहेत. दारू विक्रीमुळं आपली धार्मिक श्रद्धा दुखावली जात आहे. दुसरीकडं, मंदिरांचे शहर जम्मू हे दारूचे शहर बनलं आहे. इथं सर्वत्र दारूची दुकानं आहेत. धार्मिक स्थळं, शाळा आणि महाविद्यालयांजवळ दारू विकली जात आहे. एमआरपीपेक्षा जास्त रक्कम घेऊन बेकायदेशीरपणे दारू विकली जात आहे." अशी माहिती मनीष साहनी यांनी दिली.
अधिवेशनात दारुबंदी विधेयक मंजूर करावे : दारूची दुकानं ही ड्रग्स व्यसनाची पहिली पायरी आहे. गेल्या ५ वर्षात व्यसनमुक्ती केंद्रात येणाऱ्या लोकांची संख्या १०० पटीनं वाढली आहे. ड्रग्सची मोठ्या प्रमाणात होणारी तस्करी हे तरुणांमध्ये वाढत्या ड्रग्स व्यसनाचे स्पष्ट संकेत आहेत. येत्या विधानसभा अधिवेशनात दारुबंदी विधेयक आणून मंजूर करावं आणि नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांना त्यांचे निवेदन द्यावे अशी मागणी साहनी यांनी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याकडं केली आहे.
त्यांनी भूमिका स्पष्ट करावी : "एनसी, पीडीपी आणि इतर पक्षांच्या आमदारांनी दारुबंदीच्या प्रस्तावाचं स्वागत केलंय. मात्र यावरुन त्यांच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हणाले की, पक्षीय पातळीवर नव्हे तर, वैयक्तिक पातळीवर खासगी विधेयक आणण्याची तयारी सुरू आहे. याआधीही दारू बंदीसाठी खासगी विधेयकं आणण्यात आली आहेत, ती बनावट असल्याचं सिद्ध झालं आहे. भाजपा आमदार आणि नेत्यांनी जम्मू आणि काश्मीरमधील दारूबंदीबाबत त्यांची भूमिका स्पष्ट करावी." अशी मागणी मनीष साहनी यांनी केली आहे.
हेही वाचा :