मुंबई- बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या वाल्मिक कराड यांच्यावरून या प्रकरणात सत्ताधारी पक्षाच्या आमदारासह विरोधकांनी धनंजय मुंडे यांना लक्ष्य केलंय. त्यामुळे विरोधकांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणीसुद्धा वारंवार केली जातेय. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवारांकडून धनंजय मुंडेंना अभय देण्यात आलंय. महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडेंना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्याने स्थापन झालेल्या 'कोअर ग्रुप'मध्ये सदस्य करण्यात आलंय.
वरिष्ठ नेत्यांचा समावेश असलेला 'कोअर ग्रुप' तयार : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा(NCP)ने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी संघटना मजबूत करण्याबरोबरच धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आणि कल्याणकारी योजना सुरू करण्यासाठी वरिष्ठ नेत्यांचा समावेश असलेला 'कोअर ग्रुप' तयार केलाय. धनंजय मुंडेंबरोबरच अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, ज्येष्ठ नेते सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ हे भाजपाच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी आघाडी महायुतीच्या घटक पक्षाचे सदस्य आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या ग्रुपचा मुख्य उद्देश पक्षाची पुनर्बांधणी आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी नियोजन करणे आहे.
मुंडे भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये मंत्री : धनंजय मुंडे आणि हसन मुश्रीफ हे भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये मंत्री आहेत, तर भुजबळ आणि वळसे पाटील हे मागील एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात होते. जुलै 2023 मध्ये शरद पवारांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडणारे अजित पवार यांना आमदारांच्या संख्याबळाच्या आधारावर नंतर पक्षाचे नाव आणि घड्याळ चिन्ह मिळाले. भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीचा भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नोव्हेंबर 2024 च्या विधानसभा निवडणुकीत 57 जागा लढवल्या आणि त्यापैकी 41 जागा जिंकल्यात.
मुंडेंना कोअर ग्रुपमधील सदस्यत्व देऊन पाठबळ : राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवारांनी धनंजय मुंडेंना कोअर ग्रुपमधील सदस्यत्व देऊन त्यांना एक प्रकारे पाठबळ दिल्याचं बोललं जातंय. विरोधी पक्ष महाविकास आघाडीकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत असतानाच मुंडेंना कोअर ग्रुपमध्ये स्थान दिल्यानं अजितदादांचा मुंडेंवर अजूनही विश्वास कायम असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. बीड जिल्ह्यातील परळी येथील आमदार धनंजय मुंडेंवर विरोधी पक्षांकडून आणि सत्ताधारी महायुतीच्या काही नेत्यांकडूनही वारंवार हल्ला होतोय. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येशी संबंधित प्रकरणात त्यांचे जवळचे सहकारी वाल्मिक कराड यांना अटक करण्यात आली होती. गेल्या आठवड्यात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी धनंजय मुंडे यांच्यावर महायुतीच्या आघाडी सरकारमध्ये कृषी खात्याचा कारभार सांभाळत असताना 88 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला होता, त्यामुळे धनंजय मुंडे अडचणीत सापडले होते. अन्न आणि नागरी पुरवठा खाते सांभाळणाऱ्या धनंजय मुंडेंनी अंजली दमानियांचे आरोप निराधार असल्याचाही खुलासा केला होता.
हेही वाचा..