सातारा : महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांसाठी कडक शिक्षेची तरतूद असणारा कायदा करण्याची मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. यासंदर्भात त्यांनी मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची नवी दिल्लीत भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं.
अवमान करणाऱ्यांसाठी कडक कायदा करा : अलिकडच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्राविषयी अवमानकारक वक्तव्ये करण्यात आली आहेत. त्यामुळं तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. त्याबद्दल तीव्र पडसादही उमटले आहेत. त्यामुळं महापुरुषांच्या बाबतीत खोडसाळपणाने अवमानकारक शेरेबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणारा कायदा पारित करावा, अशी मागणी उदयनराजेंनी अमित शाहांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
नवी दिल्लीत छत्रपतींचे राष्ट्रीय स्मारक उभारा : छत्रपतींचे एकूणच जीवनकार्य आणि स्वराज्य निर्मितीमधील योगदान जागतिक स्तरावर नेण्यासाठी शिवाजी महाराजांचे नवी दिल्लीत राष्ट्रीय स्मारक उभारलं पाहिजे. जेणेकरून राज्यशास्त्र, प्रशासन, व्यवस्थापन, वास्तुशास्त्र, कायदा आणि अर्थशास्त्रातील अभ्यासकांसाठी ते पर्वणी ठरेल. त्याचबरोबर इतिहासाचे जतन आणि अचूक दस्तावेजीकरण सुनिश्चित होईल. अप्रकाशित दस्तावेज, चित्रे, शस्त्रास्त्रे आणि इतर ऐतिहासिक नोंदी एकत्रित संशोधित आणि संकलित करण्यात याव्यात, अशीही मागणी उदयनराजेंनी केलीय.
ऐतिहासिक कलाकृती परत आणा : आंतरराष्ट्रीय संग्रहालयात असलेल्या छत्रपतींच्या ऐतिहासिक कलाकृती, कागदपत्रे आणि चित्रे भारतात परत आणण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलावीत. तसेच ऐतिहासिक चित्रीकरण करताना, सिनेमॅटिक लिबर्टींचे नियमन करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात यावी, चित्रपट, टीव्ही मालिका, वेबसिरीज आणि माहितीपटात सादर केल्या जाणाऱ्या विकृत आणि काल्पनिक कलाकृतींमुळं तेढ निर्माण होते. त्यामुळं केंद्र आणि राज्य सरकारने सेन्सॉर बोर्डाला मदत करण्यासाठी इतिहासकार, संशोधक आणि तज्ज्ञांचा समावेश असलेली विशेष समिती स्थापन करावी, अशी मागणीही उदयनराजेंनी केली.
इतिहासाचं बारकाईनं दस्तावेजीकरण करावं : अचूक इतिहास समोर आणण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने खऱ्या इतिहासाचं बारकाईने दस्तावेजीकरण करणं आवश्यक आहे. त्यासाठी सर्वसमावेशक समिती स्थापन केल्यास शासनाने मान्यता दिलेला इतिहास एक मानदंड म्हणून काम करेल. वस्तुस्थितीचा विपर्यास रोखला जाईल आणि सामाजिक एकोपा राखला जावून, इतिहास संशोधक, इतिहास अभ्यासकांना अधिकृत दस्तऐवजांचा उपयोग होईल, असं उदयनराजेंनी निवेदनात म्हटलं आहे.
हेही वाचा -