शिर्डी : शिर्डीत झालेल्या दुहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ शिर्डी ग्रामस्थांच्यावतीनं आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसभेला एक दिवस होत नाही तोपर्यंत शहरात आणखी एक जीवघेणा हल्ला झाला आहे. शिर्डीतील एका भाजी विक्रेत्यावर पाच ते सहा गुंडांनी धारदार शस्त्रानं वार केल्याची घटना घडली आहे. यामुळं शहरात खळबळ उडाली आहे. ही घटना शिर्डीतील श्रीरामनगर इथं घडली.
भाजी विक्रेत्यावर जीवघेणा हल्ला : शिर्डीतील श्रीरामनगर इथं सादिक शेख आपल्या आईला भाजीपाला विक्रीसाठी मदत करतात. दररोजप्रमाणे ते भाजीपाला विक्री करत असताना अचानक पाच ते सहा जणांनी सादिक यांच्यावर धारधार शस्त्रानं जीवघेणा हल्ला केला. यावेळी हल्लेखोरांनी सादिक यांच्यावर पोटावर दोन तर, डोक्यावर एक जीवघेणा वार केला. यानंतर आरोपी पसार झाले. यानंतर सादिक यांना उपचारासाठी श्री साईबाबा संस्थानच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.
परिसरात भीतीचं वातावरण : सादिक यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. शिर्डीत काही दिवसापूर्वींच साई संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांची निर्घूण हत्या झाली होती. तर, या हल्यात एक कर्मचारी गंभीर जखमी झाला होता. या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी (दि.१०) शिर्डी ग्रामस्थांनी निषेध ग्रामसभा घेतली. या सभेला एक दिवस होत नाही तोपर्यंत पाच ते सहा जणांनी मिळून सादिक यांच्यावर जीवघेणा हल्ला केला.
सर्व आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत ठिय्या : सादिक यांच्यावर झालेल्या हल्ला मागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. या हल्ल्यातील दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या हल्ल्यातील सर्व आरोपींना अटक करा या मागणी घेऊन ग्रामस्थांनी शिर्डी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मारला आहे. तसेच जोपर्यंत सर्व आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत ठिय्या चालू ठेवणार अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.
हेही वाचा :