मुंबई : पालघर, वसई, विरारकरांसाठी महत्वाची बातमी समोर येत आहे. कित्येक वर्षापासून रखडलेला पालघर जिल्ह्यातील देहरजी पाटबंधारे प्रकल्पाला अखेर मान्यता मिळाली. साडेतीन टीएमसी पाणीसाठा असलेल्या या प्रकल्पामुळं वसई, विरार तसेच ठाणे जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. दरम्यान, या प्रकल्पासाठी २ हजार ५९९ कोटी १५ लाख रुपये एवढी मान्यता देण्यात आल्याची माहिती, मंत्री गिरिश महाजन यांनी दिली.
जनाई-शिरसाई उपसा सिंचन : दरम्यान, पुण्यातील बारामती, दौंड आणि पुरंदर तालुक्यातील सिंचनासाठी जनाई, शिरसाई उपसा सिंचनाच्या कालव्यांना बंदिस्त नलिका या कामास बैठकीत मान्यता देण्यात आली. या ४३८ कोटी ४७ लाख ८७ हजार रुपयांची मान्यता देण्यात आली. तर आज तिसरा महत्वाचा निर्णय म्हणजे महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या नियम 2019 मध्ये दुरूस्ती करण्यास मान्यता देण्यात आली. निर्णयानुसार व्यवस्थापनाचे अध्यक्ष मुख्यमंत्री असतील. समितीचे सदस्य मंत्री आणि अशासकीय सदस्य हे असणार आहेत. दरम्यान, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या समितीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना डावलण्यात आलं होतं. मात्र, आता शिंदेंचा समावेश करण्यात येणार आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेतील 10 जणाचा समावेश करण्यात आला. असा नवीन बदल करण्यात आल्याची माहिती, मंत्री गिरिश महाजन यांनी दिली.
सचिवांच्या कामगिरीवर मुख्यमंत्र्यांची नाराजी : एकिकडं राज्यात रायगड आणि नाशिकमधील पालकमंत्र्यांचा तिढा सुटला नसताना, आता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी पालक सचिवांच्या कामगिरीवर मुख्यमंत्र्यांची नाराजी व्यक्त केली. प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्र्यासोबत पालक सचिवांचीही नेमणूक करण्याचे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले. 11 जिल्ह्यात अद्यापर्यंत पालक सचिव पोहचलेच नाहीत. त्यामुळं त्या जिल्ह्यात त्वरित पालक सचिवांनी सक्रीय व्हावं, असं मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत. या व्यतिरिक्त मंत्र्यांची स्वीय सहायकाची जी मागणी होती. त्या फाईलवर मुख्यमंत्र्यांनी सही केली असून, फाईल पुढे गेली आहे. त्यामुळं आता लवकरच मंत्र्यांची स्वीय सहायकाची नेमणूक होणार आहे, अशी माहिती मंत्री गिरिश महाजन यांनी दिली.
हेही वाचा -