नागपूर- नदी म्हणजे एखाद्या गावासाठी जीवनदायिनीच. गावोगाव वाहत जाणारी नदी अनेक भागाला सुपिक करीत असते. अनेकांचा पाण्याचा प्रश्न नदीपायी सुटत असतो. नागपूरची ओळख असलेली नाग नदीसुद्धा आता स्वतःची ओळख विसरत चाललीय. कधी काळी हीच नाग नदी नागपूरच्या वैभवामध्ये भर घालायची, पण आज या नाग नदीला नाल्याचे स्वरूप प्राप्त झालंय, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. नाग नदी पुनर्जीवित करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत, असं पुढाऱ्यांकडून सांगितलं जातंय. मात्र, प्रत्यक्षात नाग नदीचे प्रदूषण जशाच तसे असल्याने या नाग नदीला आता नदी म्हणावे की नाला असा प्रश्न नागपूरकर जनतेच्या मनात घोळतोय.
नाग नदीला साबरमती नदीच्या धर्तीवरचं स्वच्छ करणार- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाग नदीच्या संदर्भात अनेकदा बैठका घेतल्या, परदेशी कंपन्यांसोबत 'करार' ही झाले, परंतु नाग नदीचे पुनरुज्जीवन अद्यापही होऊ शकलेले नाही. आता राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनीदेखील नाग नदीच्या विषयी आस्था दाखवलेली आहे, त्यामुळे पुन्हा एकदा नाग नदी स्वच्छ होईल, याबाबत सकारात्मकता निर्माण झालीय. नाग नदीला साबरमती नदीच्या धर्तीवरचं स्वच्छ करण्यात येईल, नाग नदीला देखील प्रदूषणमुक्त करू, असे दिवास्वप्नच राजकीय नेत्यांनी नागपूरकर जनतेला दाखवलंय.
नाग नदीच्या पुनरुज्जीवन प्रकल्पाची पायाभरणी - दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नाग नदी गतवैभव प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने ऐतिहासिक नाग नदीच्या पुनरुज्जीवन प्रकल्पाची पायाभरणी झाली होती. त्यानंतर या प्रकल्पाची प्रगती नेमकी कुठे खुंटली, याबाबत फारसी माहिती उपलब्ध नाही. नाग नदी प्रकल्पाचा आराखडा हा आयआयटी रुडकीच्या तज्ज्ञांनी तयार केला होता. नाग नदीच्या काठावर वॉकिंग ट्रॅक तयार केला जाईल आणि आकर्षक विद्युत व्यवस्था केली जाईल, अशीही घोषणा करण्यात आली होती.
पर्यावरण मंत्र्यांनी घेतला आढावा- महापालिकेच्या सहभागातून नाग नदीच्या प्रकल्पावर केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून 1927 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. केंद्र सरकारकडून 1 हजार 156 कोटी तर राज्य सरकार 881 कोटी रुपयांचा निधी देणार आहे, त्याचबरोबर नागपूर महानगरपालिकाही 289 कोटी रुपये खर्चाचा भार उचलणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आढावा बैठक घेतली. नाग नदीला नवे जीवन देणारा 41 किमी लांबीचा प्रकल्प आहे. त्याला 1 हजार 927 कोटींचा एकूण खर्च अपेक्षित आहे. प्रकल्पाचे काम याचं वर्षात पूर्ण होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.
नाग नदीचा इतिहास काय?- ऐतिहासिक वारसा लाभलेलं नागपूर शहर नाग नदीच्या तीरावर वसवण्यात आले होते, इतिहासात तशी नोंददेखील आहे. सुरुवातीला नाग नदीच्या काठावर नागवंशाचे लोक राहत असतील. नागपूरजवळच्या लाव्हा गावानजीक असलेल्या महादगड डोंगरातून नाग नदीचे उगम स्थळ आहे. शहराच्या अगदी मध्यवर्ती परिसरातून नाग नदी प्रवाहित होते.
हेही वाचा :