महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

T20 स्टाईलनं खेळलं कसोटी क्रिकेट, दोन त्रिशतकं झळकावणारा एकमेव भारतीय; 'बर्थ डे' बॉय सेहवागचे 'हे' विक्रम मोडणे अशक्य

वीरेंद्र सेहवागचा आज वाढदिवस आहे. त्यानं क्रिकेटमध्ये भारतासाठी असे विक्रम रचले आहेत, ज्याचा त्याच्या आधी कोणी विचारही केला नव्हता.

By ETV Bharat Sports Team

Published : 16 hours ago

Happy Birthday Virender Sehwag
वीरेंद्र सेहवाग (AFP Photo)

मुंबई Happy Birthday Virender Sehwag : भारतीय संघाचा माजी विस्फोटक सलामीवीर आणि कर्णधार वीरेंद्र सेहवागचा आज वाढदिवस आहे. 1978 साली याच दिवशी वीरेंद्र सेहवागचा दिल्लीत जन्म झाला. वीरेंद्र सेहवाग आज 46 वर्षांचा झाला आहे. 1999 मध्ये भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या वीरेंद्र सेहवागनं जगभरात खेळून अनेक विक्रम रचले, ज्याचा कोणी विचारही केला नव्हता. यानंतर तो भारताकडून सतत खेळत राहिला. तो काही वेळा संघाबाहेर होता, परंतु त्यानंतर त्यानं जोरदार पुनरागमन केलं आणि 2013 मध्ये भारतासाठी शेवटचा सामना खेळला. वीरेंद्र सेहवागनं आपल्या जवळपास 14 वर्षांच्या क्रिकेट करिअरमध्ये अनेक विक्रम केलं, ज्याबद्दल तुम्हाला माहिती असेल, परंतु असे काही रेकॉर्ड्स आहेत ज्याच्याबद्दल तुम्हाला कदाचित माहिती नसेल. आज आम्ही तुम्हाला त्याच्या काही रेकॉर्ड्सबद्दल सांगणार आहोत.

सेहवागनं भारतासाठी खेळले 374 आंतरराष्ट्रीय सामने : वीरेंद्र सेहवागनं त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत भारतीय संघासाठी 374 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यात कसोटी, एकदिवसीय आणि T20 या तीनही फॉरमॅटचा समावेश आहे. वीरेंद्र सेहवागच्या नावावर 17 हजार 253 धावांची नोंद आहे. इतकंच नाही तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा वीरेंद्र सेहवाग जगातील दुसरा फलंदाज आहे. सर्वप्रथम तुम्हाला माहित आहे की सचिन तेडुलकर होता आणि त्यानंतर वीरेंद्र सेहवागचं नाव येतं. कसोटी क्रिकेटमध्ये दोन त्रिशतकं झळकावणारा वीरेंद्र सेहवाग हा एकमेव भारतीय खेळाडू आहे. वीरेंद्र सेहवागपूर्वी एकाही भारतीयानं विचारही केला नव्हता की तो एका कसोटीत 300 पेक्षा जास्त धावा करु शकतो, पण सेहवागनं ते प्रत्यक्षात आणलं. भारतीय संघानं तीन विश्वचषक जिंकले आहेत, पहिला विश्वचषक 1983 साली कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली जिंकला होता, तर दुसरा विश्वचषक T20 मध्ये 2007 साली जिंकला होता. या संघाचा कर्णधार एमएस धोनी होता आणि वीरेंद्र सेहवागही या संघाचा महत्त्वाचा भाग होता. त्यानंतर 2011 मध्ये जेव्हा भारतानं पुन्हा एकदा वनडे विश्वचषक जिंकला तेव्हा सेहवाग त्या संघातही महत्त्वाची भूमिका बजावत होता. म्हणजेच वीरेंद्र सेहवाग अशा काही भाग्यवान भारतीय खेळाडूंमध्ये आहे ज्यांनी दोन विश्वचषकं जिंकली आहेत.

वीरेंद्र सेहवाग (AFP Photo)

100 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटनं फलंदाजी : कसोटी क्रिकेटमध्ये 100 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटनं खेळण्याचा विश्वविक्रम सेहवागच्या नावावर आहे. 2008 मध्ये चेन्नई कसोटीत त्यानं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 104.93 च्या स्ट्राइक रेटनं 319 धावा केल्या होत्या. डॉन ब्रॅडमन (334, 304, 299*) व्यतिरिक्त, फक्त वीरेंद्र सेहवाग (319, 309, 293) यांनी कसोटी सामन्यांमध्ये दोन त्रिशतकं आणि 290 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

वीरेंद्र सेहवागचे काही विक्रम :वीरेंद्र सेहवाग हा जगातील एकमेव क्रिकेटपटू आहे ज्यानं 100 चेंडूत सर्वाधिक वेळा शतक ठोकलं आहे. त्यानं आतापर्यंत सात वेळा असं केलं आहे. ऑस्ट्रेलियाचा ॲडम गिलख्रिस्ट या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्यानं सहा वेळा ही कामगिरी केली आहे. ख्रिस गेल, डेव्हिड वॉर्नर आणि ब्रेंडन मॅक्युलम यांनी 100 पेक्षा कमी चेंडूत चार वेळा शतकं झळकावली आहेत. वीरेंद्र सेहवागनं आपल्या कारकिर्दीत 2408 चौकार आणि 243 षटकार मारले आहेत. आंतरराष्ट्रीय T20 मध्ये त्याचा स्ट्राइक रेट 147.83 आहे. आजही कसोटीत सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंमध्ये वीरेंद्र सेहवाग अव्वल आहे. सेहवागच्या नावावर कसोटीत 91 षटकार आहेत. त्याची बरोबरी अजून एकाही भारतीयाला करता आलेली नाही. वीरेंद्र सेहवागनं त्याच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय सामन्यात 219 धावांची इनिंग खेळली होती. जी आजही वनडेमधली कोणत्याही कर्णधारानं खेळलेली सर्वात मोठी खेळी आहे. त्यानं पदार्पणातच शतक झळकावून सर्वांनाच चकित केलं होतं.

हेही वाचा :

  1. रोहित होता एका वर्षाचा, कोहली 24 दिवसांचा; न्यूझीलंडनं भारतात कधी जिंकला होता शेवटचा कसोटी सामना?
  2. ऋषभ पंतनं मारला 107 मीटरचा षटकार, चेंडू मैदानाच्या बाहेर; न्यूझीलंडचे खेळाडू अवाक, एकदा व्हिडिओ पाहाच

ABOUT THE AUTHOR

...view details