सातारा : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज होवून दरे गावी गेल्याच्या चर्चेनं राज्याच्या राजकारणात आज सकाळी खळबळ उडाली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी दरे इथं माध्यमांसमोर बोलताना आपण गावी आलो की नाराज असल्याच्या चर्चा सुरू होतात. मी तर इथे काम करतोय. नवीन महाबळेश्वरचा प्रोजेक्ट मोठा असल्याने मला वारंवार गावी यावं लागणार असल्याचं सांगत नाराजीचं वृत्त त्यांनी फेटाळलं.
पालकमंत्रिपदांवरून उफाळली नाराजी : मंत्रिमंडळाचा शपथविधी झाल्यानंतर मंत्र्यांनी पालकमंत्रिपदासाठी फिल्डींग लावली होती. मात्र, पालकमंत्रिपदांच्या नियुक्त्या जाहीर झाल्यानंतर शिवसेनेच्या गोटात नाराजी पसरली. नाशिक आणि रायगडचं पालकमंत्रिपद नाराजीला कारण ठरलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपलं दरे गाव गाठलं आणि त्यांच्या नाराजीची चर्चा सुरू झाली. त्यांच्या मनधरणीसाठी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन हे खास हेलिकॉप्टरनं दरे गावी जाणार असल्याची चर्चा होती. मात्र, बावनकुळे यांनी ती चर्चा फेटाळत आम्ही दरे गावी जाणार नसल्याच स्पष्ट केलं.
अपेक्षा करण्यात वावगं काय? : नाराजीच्या चर्चेसंदर्भात माध्यमांशी बोलताना 'आमच्या मंत्र्यांनी त्यांच्या जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची अपेक्षा ठेवण्यात वावगं काय'? असा उलट सवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मी, असे तिन्ही नेते एकत्र बसून यावर मार्ग काढू, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
नाराज कुठंय? मी तर काम करतोय : मी गावी आलो की नाराज झाल्याच्या चर्चा होतात. मी तर गावी येऊन काम करतोय. नवीन महाबळेश्वरचा प्रोजेक्ट हाती घेतलाय. प्रोजेक्ट मोठा असल्यानं मला वारंवार गावी यावं लागणार आहे. पर्यटनाचा जिल्हा म्हणून साताऱ्याची ओळख निर्माण करण्यासाठी जे कष्ट घ्यावे लागतील, ते इथला भूमिपुत्र म्हणून आपण घेणार असल्याचंही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलं.