गॉल Steve Smith Record : ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथनं पुन्हा एकदा शतक ठोकून चमत्कार केला आहे. गॉल इथं खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटीत स्मिथनं 191 चेंडूत शतक झळकावलं. स्मिथच्या कारकिर्दीतील हे 36 वं कसोटी शतक आहे. स्मिथनं गॉलमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीतही शतक झळकावलं होतं. त्यानं त्या सामन्यात 141 धावांची खेळी खेळली होती. या शतकासह स्टीव्ह स्मिथनं अनेक मोठे टप्पे गाठले आहेत. कसोटीत सर्वाधिक शतकं करण्याच्या बाबतीत त्यानं राहुल द्रविड आणि जो रुट यांची बरोबरी केली आहे. या दोन्ही दिग्गजांनी कसोटीत 36 शतकं केली आहेत. एवढंच नाही तर, सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके ठोकण्याच्या बाबतीत स्मिथनं आता रोहितची बरोबरी केली आहे. त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 48 शतकं झळकावली आहेत.
स्मिथ पुन्हा बनला रन मशीन : भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेपूर्वी स्टीव्ह स्मिथला शतकाची आस होती. या खेळाडूनं 12 कसोटी सामन्यात एकही शतक झळकावलं नव्हतं. स्मिथचं शतक 32 वरच थांबलं होतं पण भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान तो फॉर्ममध्ये आला आणि तेव्हापासून या खेळाडूनं गेल्या पाच कसोटी सामन्यांमध्ये चार शतकं झळकावली आहेत. या खेळाडूनं 50 दिवसांत 32 ते 36 कसोटी शतकं पूर्ण केली आहेत.