पुणे- दोन दिवसांपूर्वी राज्याचे माजी मंत्री आमदार तानाजी सावंतांच्या मुलाचं अपहरण झाल्याचं सांगून बँकॉकला आपल्या मित्रांबरोबर गेलेल्या मुलाला पोलिसांनी परत पुण्यात आणलंय. यावरून आता जोरदार राजकारण होत असून, आज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीने सिंहगड पोलीस ठाण्यात निवेदन दिलंय. कुटुंबातील भांडणांमुळे घरी कोणालाही न सांगता बँकाॅकला चाललेल्या मुलाच्या शोधासाठी माजी मंत्री तानाजी सावंतांनी त्यांच्या मुलाच्या शोधासाठी सगळी पोलीस यंत्रणा आणि सरकारी यंत्रणा कामाला लावली, यासाठी झालेला सर्व खर्च त्यांच्याकडून वसूल करावा, तसेच ज्यांनी पोलिसांची फसवणूक केली, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी शिवसेनेकडून करण्यात आलीय.
सिंहगड पोलीस ठाण्यात निवेदन देत मागणी : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाच्या वतीने सिंहगड पोलीस ठाण्यात निवेदन देत मागणी करण्यात आलीय. यावेळी शिवसेना शहराध्यक्ष गजानन थरकुडे म्हणाले की, पोलिसांकडून याची ज्या पद्धतीने चौकशी करायला पाहिजे, त्या पद्धतीने चौकशी केली जात नाहीये. ज्यांनी तक्रार दिली, त्यांच्यावर पहिले गुन्हा दाखल केलं पाहिजे. त्यांनी पोलिसांची फसवणूक केलीय. घरातील मुलाचं भांडण असताना तानाजी सावंत यांनी संपूर्ण यंत्रणा कामाला लावली आणि पोलिसांना चुकीची माहिती देत अपहरणाचा गुन्हा दाखल केलाय आणि मग मित्रांच्या बरोबरच गेला असल्याचं सांगितलं. यामुळे याची चौकशी करून सर्व खर्च त्यांच्याकडून वसूल करावा, तसेच ज्यांनी पोलिसांची फसवणूक केली त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा ही आमची मागणी आहे, असंही यावेळी थरकुडे म्हणाले.
प्रशासनाला वेठीस धरलं गेलं : यावेळी शहराध्यक्ष संजय मोरे म्हणाले की, घरात भांडण असताना आणि मुलगा आपल्याला हाती लागत नाही हे लक्षात आल्यावर प्रशासनाला वेठीस धरलं गेलं आणि प्रशासनाला कामाला लावून मुलाला परत आणलं. खोटा अपहरणाचा गुन्हा दाखल करून पोलिसांची फसवणूक केल्याने पोलिसांनी यावर तात्काळ कारवाई करावी, अशी आमची मागणी असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलंय.
हेही वाचा-