ढाका WTC Point Table Update BAN vs SA Test : ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट टेबलमध्ये पुन्हा एकदा बदल झाला आहे. दक्षिण आफ्रिकेनं बांगलादेशला त्यांच्याच घरात हरवलं आहे. यासह संघानं WTC पॉइंट टेबलमध्ये मोठी झेप घेतली आहे. यामुळं एकीकडं दक्षिण आफ्रिकेचा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी प्रबळ दावेदार म्हणून समोर आला असताना दुसरीकडे भारतीय संघाच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. तर दुसरीकडे या पराभवामुळं बांगलादेशचं मात्र नुकसान झालं आहे. विशेश म्हणजे दक्षिण आफ्रिकेनं 2014 नंतर प्रथमच आशियात कसोटी सामना जिंकला आहे.
सात गड्यांनी दक्षिण आफ्रिकेचा विजय : बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना ढाका येथील शेर-ए-बांगला इथं खेळला गेला. या सामन्यात गुरुवार, 24 ऑक्टोबर रोजी सामन्याच्या चौथ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेनं बांगलादेशचा सात गड्यांनी पराभव करुन सामना जिंकला. या सामन्यात कागिसो रबाडा (9 विकेट) आणि काइल वॉरेन (114 धावा) विजयाचे नायक ठरले. उल्लेखनीय म्हणजे दक्षिण आफ्रिकेने 10 वर्षांनंतर आशियामध्ये कसोटी सामना जिंकला.
मालिकेत 1-0 अशी आघाडी : तत्पूर्वी, बांगलादेशनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर त्यांचा पहिला डाव अवघ्या 106 धावांत सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेनं 308 धावा केल्या होत्या, त्यानंतर मेहदी हसन (97), हसन जॉय (40) आणि जाकर अली (58) यांच्या खेळीच्या जोरावर बांगलादेशनं दुसऱ्या डावात 307 धावा जोडल्या. यानंतर दक्षिण आफ्रिकेनं तीन गड्यांच्या मोबदल्यात हे लक्ष्य गाठलं. यासह त्यांनी दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.
बांगलादेशविरुद्धच्या विजयाचा दक्षिण आफ्रिकेला मोठा फायदा : बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना दक्षिण आफ्रिकेनं सात गडी राखून जिंकला आहे. यासह दक्षिण आफ्रिकेच्या संघानं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत थेट चौथ्या क्रमांकावर कब्जा केला आहे. या सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिका 38.890 च्या पीसीटीसह सहाव्या क्रमांकावर होता. परंतु या एका विजयानं त्यांचा पीसीटी 47.62 पर्यंत वाढला आहे. या एका विजयासह संघानं दोन स्थानांनी झेप घेत थेट चौथ्या क्रमांकावर कब्जा केला आहे.
भारत, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका अजूनही टॉप 3 मध्ये : सध्याच्या पॉइंट टेबलमधील टॉप 3 संघांबद्दल बोलायचं झाल्यास, भारतीय संघ सध्या 68.060 PCT सह पहिल्या स्थानावर कायम आहे आणि त्यांचं स्थान अबाधित आहे. यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांची PCT 62.500 आहे. श्रीलंका तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांचा PTC सध्या 55.560 वर आहे. चांगली गोष्ट म्हणजे दक्षिण आफ्रिकेला अंतिम फेरी गाठण्याची मोठी संधी आहे. आता संघाला बांगलादेशविरुद्ध आणखी एक कसोटी खेळायची आहे. यानंतर संघाला घरच्या मैदानावर पाकिस्तान आणि श्रीलंकेशी खेळायचं आहे. दक्षिण आफ्रिकेला घरच्या मैदानावर कसोटीत हरवणं अजिबात सोपं नाही. अशा परिस्थितीत जर दक्षिण आफ्रिकेनं हा सामना जिंकला तर त्यांनाही फायनल गाठण्याची संधी असेल.
भारताचं टेंशन वाढलं : आता भारताबद्दल बोलायचं झालं तर भारतीय संघ सध्या पहिल्या क्रमांकावर असला तरी न्यूझीलंडनं भारताचा खेळ खराब केला आहे. न्यूझीलंडनं बंगळुरु कसोटीत भारतीय संघाचा पराभव करुन मोठा अपसेट निर्माण केला आहे. आता भारतीय संघाला अंतिम फेरी गाठण्यासाठी न्यूझीलंडविरुद्धचे उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत. यासोबतच ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाईल तेव्हा त्यातील किमान दोन सामने जिंकावे लागतील, तरच अंतिम फेरीतील स्थान निश्चित होईल. भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध जिंकला तरी ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानावर पराभूत करणं फार कठीण काम असणार आहे. त्यामुळं भारताला केवळ आपले सामने जिंकायचे नाहीत, तर इतर संघांच्या कामगिरीवरही लक्ष ठेवावं लागणार आहे.
हेही वाचा :
- 27 षटकार, 30 चौकार, 344 धावा... विश्वविक्रमी विजयासह झिम्बाब्वे ठरला 'सिकंदर'; रोहित आणि सूर्याचा विक्रमही मोडीत
- पाकिस्तानविरुद्ध त्रिशतक झळकावणाऱ्या खेळाडूला संघात स्थान नाही; नव्या कर्णधारासह इंग्लंड संघाची घोषणा