मुंबई- मुंबईतील तापमानाचा पारा खाली घसरल्यानं सर्वत्र कडाक्याची थंडी जाणवत आहे. मंगळवारी गेल्या आठ वर्षातील सर्वात कमी तापमानाची नोंद सांताक्रुज येथे नोंदवण्यात आली. सांताक्रुज येथे 16.8 डिग्री सेल्सिअस इतके तापमान नोंदवण्यात आले. देशातील मान्सून परतल्यानंतर उत्तरेकडील थंड वारे महाराष्ट्राकडे येण्याचं प्रमाण वाढू लागले आहे. त्यामुळे राज्यात तापमानाचा पारा घसरत चालला आहे.
मुंबईतील तापमानाचा पारा 2016 च्या नोव्हेंबरनंतर मंगळवारी 16.8 डिग्री सेल्सिअस इतक्या खाली पहिल्यांदाच गेला आहे. मुंबईतील हवामानात पुढील तीन ते चार दिवस गारवा राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पुढील तीन ते चार दिवस पारा 17 अंशांवर राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार नोव्हेंबर 2024 हा गेल्या आठ वर्षातील सर्वाधिक थंड महिना असल्याचे समोर आले आहे. यापूर्वी 11 नोव्हेंबर 2016 रोजी सांताक्रुज येथे 16.3 डिग्री सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं होतं.
मुंबईत सर्वात कमी तापमान केव्हा होते? सांताक्रुज येथे नोंदवण्यात आलेले 16.8 डिग्री सेल्सिअस तापमीन मुंबईतील सरासरी तापमानाच्या 3.8 डिग्री सेल्सियसने कमी आहे. तर कुलाबा येथील तापमान 22.5 डिग्री सेल्सिअस इतके नोंदवण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईतील तापमानात घट झाल्यानं तापमान 18.5 डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली उतरले होते. 2022 च्या नोव्हेंबरनंतर इतके खाली तापमान पहिल्यांदाच उतरले होते. मुंबईत 1950 मध्ये सांताक्रुज येथे 13.3 डिग्री सेल्सिअस इतके तापमान नोंदवण्यात आलं होते. हे तापमान मुंबईतील आजपर्यंतचे सर्वात कमी तापमान समजले जाते.
मुंबई शहरात पुढील तीन ते चार दिवस थंडीची लाट राहणार- हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुंबई शहरात पुढील तीन ते चार दिवस थंडीची लाट कायम राहील. मुंबईतील किमान तापमान 17 डिग्री ते 19 डिग्री सेल्सिअस यादरम्यान राहील. मात्र, एक डिसेंबरपासून या तापमानात वाढ होऊन किमान तापमान 21 डिग्री अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. वातावरणात धुके पसरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे किमान तापमानात 3.8 अंशांची घट झालेली असताना मुंबई शहर उपनगरातील दिवसाचे तापमान 32 व 33 डिग्री अंश सेल्सिअसदरम्यान राहीलं आहे.
आज पुण्यात कसे असणार तापमान?राज्यातही तपामानाचा पारा घसरला आहे. हवामान विभागानं पुणे आणि आजूबाजूच्या काही भागात 10-12 अंश सेल्सिअस तापमानाचा अंदाज वर्तविला आहे. तर उर्वरित ठिकाणी ते 12-14 डिग्री सेल्सियस राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे. कोकणात तापमान 14 ते 16 किंवा त्याहून जास्त तापमान राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तविला आहे.
राज्यात कोणत्या भागात आहे प्रदुषित हवा- केंद्र सरकारच्या मुंबईतील हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक 156, म्हणजे मध्यम स्वरूपाचा राहिला. राज्याच्या काही भागात आणि जिल्ह्यात हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक मध्यम स्वरुपाचा राहिला. यामध्ये भोईसर, उल्हासनगर, मुलुंड, म्हापे, नेरुळ, कोपरीपाडा, माझगाव, मालेगाव, धुळे , जळगाव, नागपूर, ,चंद्रपूर,नांदेड, परभणी, लातूर, सोलापूर, पुणे, थेरगाव आणि अहमदनगरचा समावेश आहे.