मुंबई- राज्यातील मुख्यमंत्रिपदाच्या निवडीबाबत असलेला तिढा जवळपास संपला आहे. भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रेम शुक्ला यांनी मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर पक्ष ठाम असल्याचं सांगितलं. शिवसेनेच्या नेत्यांकडून बिहार मॉडेल राबवण्याच्या मागणीवरही त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे महाराष्ट्राचं मुख्यमंत्री नेमकं कोण होणार? याचा फैसला लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचं भाजपाच्या गोटातून सांगण्यात येत आहे.
15 व्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने घवघवीत यश संपादन केल्यानंतर आता मुख्यमंत्री कोण? यावरून भाजपा आणि शिवसेनेमध्ये जुंपली आहे. महाराष्ट्रातील एकूण 288 जागांपैकी महायुतीने एकूण 230 जागा जिंकल्या. यात भाजपानं सर्वाधिक 132, शिवसेनेनं 57 तर राष्ट्रवादी काँग्रेसनं 41जागी विजय संपादन केला आहे. अशाप्रकारे बघितलं तर भाजपाच्या सर्वाधिक जागा असल्याने त्यांचाच मुख्यमंत्री पदावर प्रबळ दावा आहे.
कशामुळे मुख्यमंत्रिपदाचा तिढा- शिवसेनेकडून खासदार नरेश मस्के, आमदार संजय शिरसाट, आमदार भरत गोगावले हे मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांच्या नावासाठी आग्रही आहेत. आमदारांची संख्या कमी असूनही बिहारमध्ये नितीश कुमार यांना मुख्यमंत्री करण्यात आले. तोच पॅटर्न महाराष्ट्रात राबवा अशी शिवसेनेच्या नेत्यांची आग्रही मागणी आहे. तर बिहारमधील परिस्थिती वेगळी होती. इथे तसं नाही. म्हणून ही मागणी कदापी मान्य होऊ शकत नाही, असं भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रेम शुक्ला आणि भाजपाचे नेते रावसाहेब दानवे यांचे मत आहे.
विजयाचे प्रमुख शिल्पकार एकनाथ शिंदे-विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा सुपडा साफ केल्यानंतर आपलाच मुख्यमंत्री व्हावा, यासाठी महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये चढाओढ सुरू आहे. यामध्ये भाजपाच्या सर्वाधिक जागा आल्याने मुख्यमंत्री पद हे भाजपच्या वाट्याला जाणार यात कुठली शंका नाही. परंतु राज्याची निवडणूक हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढवण्यात आली. त्यामुळे या विजयाचे प्रमुख शिल्पकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असून हे आहेत, असा शिवसेनेकडून दावा करण्यात येत आहे. एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री केलं जावं, अशी मागणी शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे. हरियाणामध्येसुद्धा सैनी यांच्या नेतृत्वात निवडणूक लढविली गेली. निवडणुकीनंतर त्यांना मुख्यमंत्री करण्यात आले. तोच पॅटर्न राज्यात राबवावा, अशी मागणी म्हस्के यांनी केली आहे. याच पद्धतीनं आमदार संजय शिरसाट आणि भरत गोगावले यांनीही एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करावे, अशी मागणी केली आहे. दुसरीकडे भाजपाच्या नेत्यांकडून ही मागणी फेटाळून लावण्यात आली आहे.
बिहार पॅटर्न लागू होणार नाही-बिहार पॅटर्नच्या मुद्द्यावर बोलताना भाजपाचे नेते, राष्ट्रीय प्रवक्ते प्रेम शुक्ला म्हणाले,"एका खासदाराचं वक्तव्य हे पक्षाचं वक्तव्य समजणं म्हणजे अतिशयोक्ती ठरेल. आमच्या तिन्ही पक्षांमध्ये योग्य समन्वय आहे. अगोदर लोकांना शंका होती की, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढवेल का? तर हो या तिघांनी एकत्र निवडणूक लढवली. भरघोस मतानं विजयसुद्धा संपादन केला. आता मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचा होणार की एकनाथ शिंदे होणार? यावर शंका व्यक्त केली जात आहे. परंतु ही शंका सुद्धा लवकरच दूर केली जाईल. भारतीय जनता पक्षाचे संसदीय मंडळ आणि तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते बसून यावर निर्णय घेतील. हे मजबूत सरकारसुद्धा पाच वर्षाचा कार्यकाल पूर्ण करेल."
एकनाथ शिंदे हे जबाबदार व्यक्ती- पुढे भाजपाचे नेते शुक्ला म्हणाले, " महाराष्ट्रात बिहार पॅटर्न लागू होणार नाही. कारण बिहारमध्ये आम्ही मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा निवडणुकीपूर्वीच घोषित केला होता. परंतु महाराष्ट्रात असं नव्हतं. महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांचे नाव हे निवडणुकीनंतर घोषित केलं जाईल, असं आमच्यात ठरलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जबाबदार व्यक्ती आहेत. त्यांना सर्व माहित आहे. म्हणून त्यांचे खासदार नरेश मस्के काय म्हणतात, त्याकडे लक्ष द्यायची गरज नाही," असंही प्रेम शुक्ला म्हणाले आहेत.
रावसाहेब दानवेंची उद्धव ठाकरेंवर टीका-राज्याची भाजपाचे निवडणूक संचलन समितीचे प्रमुख भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी सुद्धा बिहार पॅटर्न राज्यात लागू होणार नसल्याचं ठामपणं सांगितलं आहे. रावसाहेब दानवे म्हणाले, " बिहार वेगळा आहे. महाराष्ट्र वेगळा आहे. बिहारप्रमाण महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वीच मुख्यमंत्री कोण होणार असे ठरविण्यात आले नव्हते. मी स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या बैठकीत उपस्थित होतो. मुख्यमंत्री पदासाठी निवडणुकीनंतर पुढचा निर्णय होईल, असं बैठकीत ठरविण्यात आलं होते. २०१९ साली सुद्धा जनतेनं भाजपा शिवसेनेला कौल दिला होता. परंतु मुख्यमंत्री पदाच्या मोहामुळे उद्धव ठाकरे हे आमच्याकडे पर्याय खुले आहेत, असे बोलले. ते बाळासाहेबांना शिव्या-शाप देणाऱ्यांसोबत जाऊन बसले, "असा टोलाही दानवे यांनी लगावला आहे.
काय आहे बिहार पॅटर्न?बिहारमध्ये भाजपा आणि संयुक्त जनता दलाचे (JDU) सरकार एकत्र आहे. विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांच्या पक्षाला भाजपापेक्षा कमी जागांवर विजय मिळविता आला. त्यानंतरही कमी संख्याबळ असून सुद्धा भाजपानं नितीश कुमार यांना पाठिंबा देत मुख्यमंत्री केलं. २०२२ मध्ये शिवसेना फुटीनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार पडलं. तेव्हासुद्धा बिहार पॅटर्नचा अवलंब करत राज्यात एकनाथ शिंदे यांच्याकडे कमी आमदारांची संख्या असून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद देण्यात आलं. भाजपा आपल्या मित्र पक्षावर अन्याय करतो, हा उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात येणारा आरोप पुसून टाकण्यात यश आलं. याकरता बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वात निवडणुका लढवून त्यांना मुख्यमंत्री करण्यात आलं. त्याचप्रकारे महाराष्ट्रात सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात निवडणूक लढण्यात आल्यानं त्यांना मुख्यमंत्री करावं, अशी मागणी शिवेसेनेच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे.
2019 प्रमाण मुख्यमंत्रिपदाचा तिढा: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 च्या निकालात महाविकास आघाडीचा सुपडासाफ झाल्यानंतर राज्यात महायुतीचा मुख्यमंत्री नेमका कोण होणार, याची चर्चा शिगेला पोहोचली आहे. शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री पदावर दावा सांगितला आहे. त्यामुळे 2019 ला असलेली स्थिती राज्यात पुन्हा उद्भवली आहे.
राष्ट्रवादीनं वाढवली शिवसेनेची धाकधूक : शिवसेना भाजपामध्ये मुख्यमंत्री पदावरुन रस्सीखेच सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं शिवसेनेची धाकधूक वाढवली आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटलं, "भाजपाला 132 जागा मिळाल्या आहेत. त्यांच्याकडं आमदारांचं मोठं पाठबळ आहे. त्यामुळे भाजपा जो मुख्यमंत्री पदाचा चेहरा देईल, तो आम्हाला मान्य असेल". त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं शिवसेनेची बार्गेनिंग पॉवरमधील हवाच काढून घेतली, अशी चर्चा करण्यात येत आहे. त्यामुळे शिवसेनेची धाकधूक प्रचंड प्रमाणात वाढल्याचा आरोपही विरोधकांकडून करण्यात येत आहे.
हेही वाचा :